www.24taas.com, पिंपरी
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे.
आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो. वारीप्रमाणेच रिंगण सोहळ्यालाही अनेक वर्षांची परंपरा आहे. हजारो नागरिकांनी मोठ्या भक्तिभावानं पालखीचं स्वागत केलं.
विठू नामाच्या गजरानं पिंपरीतलं वातावरण भारुन गेलं होतं. शेकडो मैलाचं हे अंतर कापताना वारकरी जरी उत्साहात असले तरी त्याना थकवा जाणवू नये, त्यांचं चैतन्य कायम राहावं यासाठी या रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं जातं.
दरम्यान, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम आळंदीतल्या गांधीवाड्यात आहे. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार आहे.
पुण्यात फोटोवारी
पंढरीच्या वारीत न जाता देखील देहू-आळंदीपासून थेट पंढरपूरपर्यंतची वारी पुणेकरांना अनुभवता येणार आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून ही आनंदवारी पुणेकरांच्या भेटीला आलीये. शहरातील घोले रोड आर्ट गॅलरीत वारीतील छायाचित्रांचे प्रदर्शन भरलंय.
देहू, आळंदी ते पंढरपूर असा वारीचा प्रवास सर्व वैशिष्ट्य आमि बारकाव्यांसह या छायाचित्रांमध्ये टिपण्यात आलंय. पालखी, रथ, माऊलींच्या पादुका, समाज आरती, वारीतील खेळ अशी संपूर्ण वारी या छायाचित्रांच्या माध्यमातून अवतरली आहे.
वारीची ही अनोखी फोटोग्राफी केलीय प्रज्ञेश मोळक या तरुण अभियंत्याने. वारी संतांची डॉट कॉम या वेबसाईटवरदेखील ही छायाचित्र आणि वारीची इत्तंभूत माहिती उपलब्ध आहे.