www.24taas.com, सातारा
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: कहर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यांत सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतो आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण या अवस्थेवर रडण्यासाठीही या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी शिल्लक नाही. तालुका खटाव दातेवाडी. भर दुपारी या गावात टँकर चार दिवसांनी येतो. पण पाणी गावकऱ्यांना देण्यात येत नाही. तर विहिरीत सोडण्यात येतं. महिलांना विहिरीतून पुन्हा पाणी वर उपसावं लागतं. ही उलटी कसरत करण्याचं कारण म्हणजे पाणी भरताना होणारी भांडणं. भांडणं टाळण्यासाठी टँकरचालकानं हा मार्ग स्वीकारला आहे.
एकट्या दातेवाडीत नाही, तर प्रत्येक गावात हेच पहायला मिळतं. गावात सार्वजनिक विहीर नसतील तर रस्त्याच्या कडेला ड्रम आणि भांड्यांची रांग दिसते. माण तालुक्यात प्रसिद्ध गोंदवल्यापासून जवळ असलेलं किरकसाल गाव. पहाटे सुर्योदय होण्याआधाची गावातल्या विहीरीवर बाया बापड्या जमतात. विहिर खोल आणि तळाला गेलेले, तरी पाण्यासाठी जीवाचा धोका पत्करण्याचीही त्यांची तयारी असते. यात लहानगीही मागे नाहीत. शिरवली गावात विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याचंही ते सांगतात. मात्र या धडपडीला पर्याय नाहीये.
टँकरही गावात सहजासहजी येत नाहीत. ग्रामसभेला ठराव करुन द्यावा लागतो. पण टँकर लगेच आला तर शासकीय यंत्रणा ती काय. मग तहसीलदार, पंचायत समितीत खेटे घाला. त्यांची मनधरणी करा, अशा नाकदुऱ्या काढाव्या लागतात. या दुष्काळात होरपळेलेलं असचं वळई गाव. गावानं टँकरचा प्रस्ताव दिला २६ फेब्रुवारीला. अजून टँकरचा पत्ता नाही. ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दुसरीकडे विरळी गावात ऑक्टोबरपासूनच टँकर सुरु झाले. विरळीत देवालाही दुष्काळाचा फटका बसला. देवाच्या मंदिराचं काम पाण्याअभावी वर्षभरापासून बंद पडलं.
यातून नशिबानं टँकर आलाच. तर टँकरचं पाणी अस्वच्छ असतं. पिण्याच्या लायक नसलेलं पाणी त्यांना पर्यायच नसल्यानं प्यावचं लागतं. आटत चाललेल्या तलाव, नद्यांतून आता गाळच उरला. त्यामुळं स्वच्छ पाणी आणायचं कुठून हाही प्रश्न आहेच. या ढाकणी तलावासारखीच स्थिती येरळवाडी, आंधळी, देवापूर अशा पाणी शिल्लक असलेल्या तलावांची आहे. विहीरी तर तळाला गेलेल्याच आहेत. या पाण्यामुळं रोगराई सोडाच, माणसं दगावण्याचीही भीती आहे. हे दूषित पाणी नको असेल, तर हातपंपावर अर्ध्या कळशीसाठीचा संघर्ष त्याहूनही कष्टाचा आहे.