www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुकवर जे जे आहेत, त्यांना आता खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण आता फेसबुकने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. यापुढे 'पोस्ट हायलाईट' सुविधेसाठी दोन डॉलर इतकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सोशल नेटवर्किंगसाईटमध्ये फेसबुक हे सर्वांत आघाडीवर आहे. त्याच्या युझर्सची संख्या १०० कोटींच्या वर असून, त्यात वाढ सुरूच असल्याने 'स्पेस मॅनेजमेंट' म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होईल. सध्या कंपनीच्या उत्पन्नाचा स्रोत केवळ जाहिराती हाच असून, गेल्या वर्षी कंपनीने जाहिरातीच्या माध्यमातून १.१४ बिलियन अमेरिकी डॉलर एवढा महसूल मिळविला. फेसबुकच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग सुरू असतात.
तुम्हाला माहिती अपलोड करायची असल्यास तुमच्यापुढे दोन ऑप्शन येतील. मोफत माहिती अपलोड करायची आहे की शुल्क देऊन. त्यानंतर तुम्ही माहिती अपलोड करू शकाल. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यानुसार, ज्या वेळी माहिती अथवा फोटो अपलोड करायचा आहे, त्या वेळी दोन पर्याय तुम्हाला विचारण्यात येतील. पहिला अर्थातच मोफत आणि दुसरा पर्याय दोन डॉलर भरून अपलोड करण्याचा आहे.
मोफत पर्यायाचा अवलंब केल्यावर तुमच्या वॉलवर जरी तुमचा मजकूर तातडीने अपलोड झाला तरी, जनरल न्यूज फीड किंवा मित्रांना दिसण्यासाठी त्या मजकुराला वेटिंग लिस्टवर राहावे लागेल; तर २ डॉलर भरून पोस्ट करण्यात येणारा मजकूर तातडीने किंवा सध्या ज्या प्रमाणे दिसतो त्या प्रमाणे दिसेल. तसेच पैसे भरून केलेल्या मजकुराला पिवळ्या रंगाचा टॅग लागेल.