मेघालय-महाराष्ट्र जोडणारा ज्ञानसेतू

६ जून ते १८ जून या दरम्यान एक गट मेघालयला जाणार म्हणून मे महिन्यापासूनच बैठकी सुरु झाल्या होत्या.

Updated: Jul 14, 2015, 03:26 PM IST
मेघालय-महाराष्ट्र जोडणारा ज्ञानसेतू title=


 

श्वेता भांडरकर
६ जून ते १८ जून या दरम्यान एक गट मेघालयला जाणार म्हणून मे महिन्यापासूनच बैठकी सुरु झाल्या होत्या. तिकडे मुलांना शिकवण्यासाठी जे fun with science and science with fun घेण्याची कार्यशाळा झाली आणि आमची इकडे कृती सत्राची रंगीत तालीम सुरू झाली. आणि तो दिवस उजाडला. प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्ञानसेतू अंतर्गत आम्ही ‘युवती’ मेघालयला जाण्यासाठी निघालो. ज्ञानसेतू – एक उपक्रम, भारतातल्या दुर्गम भागात विज्ञान-कार्यशाळा घेणे आणि त्याद्वारे आपल्या देशबंधूंशी प्रेमभाव प्रस्थापित करणे. असा याचा उद्देश...

i.e. gyansetu isYear-long program, short residential visits of volunteers in remote areas of developmentally challenged states of India.For building “communication bridges” through knowledge exchange, inculcating “national integrity” 

तिथे आलेले सगळे अनुभव सगळ्यांना सांगावे आणि पूर्वांचल भारताबद्दल अनेकांच्या मनात असलेले गैरसमज खोडून काढावे असे मनात आले. अनेक विविधतेने नटलेल्या भाषांच्या विशेषतः खासी आणि पनार बोली बोलल्या जाणाऱ्या मेघालयात आम्ही पोहोचलो. तिकडे आम्ही खासी हिल्स आणि जयंतीया या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलो.


मेघालयातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देताना श्वेता भांडारकर

 अगदी निसर्गाच्याच कुशीत वसलेल्या गावातल्या घरांमध्ये आम्ही राहिलो. तिथली कमालीची स्वच्छता आणि लोकांच गावांमध्ये असूनही टापटीप राहण हे पाहून आम्हाला अहो आश्चर्य वाटल. स्वच्छतेबद्दल सांगायचं तर आपण न चप्पल घालता, न खाली बघता अगदी बिनधास्त गावात हिंडू शकतो. दर २० पावलांवर ठिकठिकाणी बांबूनी विणलेल्या कचरा पेट्या होत्या. आपण तिथल्या नयनरम्य निसर्गाला डोळे भरून पाहू शकतो. 


 

आम्हाला तितकाच आश्चर्य तिथली मातृसत्ताक पद्धत पाहून झालं. तिथे आईच आडनाव पुढे मुलांनी लावावे अशी पद्धत आहे. मुली लग्नानंतर आई जवळच राहतात तर मुल लग्नानंतर सासरी जातात. मुलींना वारसा हक्क अर्थातच परंपरेने मिळतो. अस सगळ पाहून आणि ऐकून खूप छान वाटल. जगाच्या पाठीवर मातृसत्ताक पद्धत जपणारी खूप कमी राज्य आहेत. असं विलक्षण राज्य आपल्या भारत देशात आहे याचा आपणास अभिमान वाटायला हवा.

तिथला निसर्ग जितका निर्मळ आणि प्रांजळ आहे तितकेच निर्मळ आणि प्रांजळ तेथील लोक. त्यांचा पाहुणचार आणि निस्सीम प्रेम पाहून मनात एकदा तरी नक्की येत की आपण इतके नितळ प्रेम खरंच कुणावर करू शकतो का? तेथील लोक त्यांच्या परिस्थितीत ‘संपन्न’ आहेत. म्हणूनच कदाचित पूर्ण मेघालयात आम्हाला एकही भिकारी असा दिसलाच नाही. आहे त्या परिस्थितीत त्याचं खूप मस्त चाल्लय. त्यांच्या कडून शिकण्यासारख खूप काही आहे. स्वच्छता, प्रेमभाव, समाधान.

आम्ही भारावलो ते तेथील युवकांचे विचार ऐकून. तिथल्या युवक युवतींचे शिक्षण कुठल्याही राज्यात झालेले असो, परंतु त्या शिक्षणाचा उपयोग ते आपल्या गावासाठीच करणार. पुढील जीवनप्रवास हा ते त्यांच्या गावातच करणार. अशी त्यांची इच्छा आणि अनेक उदाहरणही आहेत. आपण शहरात राहून परदेशात जाण्याची स्वप्ने बघतो आणि ते बाहेरून उच्चशिक्षण घेऊन गावात परत येण्याची इच्छा ठेवतात. असे तरुण जेथे आहेत ते राज्य आणि तो देश प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार यात दुमत असूच शकत नाही. 

खूप सारे धबधबे, जमिनीवर उतरलेले ढग (आणि ढगात असलेली जमीन), पाऊस, सुंदर सुंदर फुलं, अगदी सर्रास बघायला मिळणारी फणस, अननस आणि त्यांची झाड पाहून कुणीही तोंडात बोट घातल्या वाचून राहणार नाही. तिथली घर देखील मनात घर करून जातात. छोटी पण टुमदार, चारही बाजूंनी रंगीबिरंगी फुलं लावलेली, अगदी परीकथेतील घरांसारखी घर आहेत. डोंगरावर बांधलेली.... फार छान वाटल. अशा सर्व गोष्टी पाहण्यात आणि अनुभवण्यात १० दिवस कुठे गेले कळलच नाही.

आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा आम्ही निघणार होतो. खरच नको वाटत होत ते सगळ सोडून यायला. ते डोंगर, दऱ्या पाहण्याची सवयच होऊन गेली होती. हळहळ मनात वाटत होती की आपण इतके दिवस या स्वर्गापासून दूर होतो. प्रत्येकाने जाऊन पाहावे, अनुभवावे असा एक अविस्मरणीय प्रवास घडला. यासाठी आम्ही ज्ञान प्रबोधिनीचे आणि ज्ञानसेतूचे ऋणी आहोत. तिथून निघतांना डोळ्यात पाणी होत, आमच्या आणि तेथील लोकांच्याही. सगळ्यांचा निरोप घ्यावा लागत होता. मात्र एकच इच्छा आजही मनात जागृत आहे, तिथे परत जाण्याची, काम करण्याची..........

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.