स्वाती नाईक, www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळानं चौदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यातल्या तेरा शाळा मागच्या वर्षीही अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये होत्या. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. या शाळांवर राज्य सरकार कारवाई करणार की महापालिका, या गोंधळात त्यांच्यावर दंडच आकारला गेलेला नाही. परिणामी अनधिकृत शाळांची संख्याही वाढत चालली आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळानं यावर्षीही चौदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलीय. त्यात मराठी आणि हिंदी माध्यमाच्या प्रत्येकी दोन तर इंग्रजी माध्यमाच्या दहा शाळांचा समावेश आहे. या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
या चौदा शाळा अनधिकृत असल्याचं घोषित करण्यात आलंय. पालिकेच्या शिक्षण मंडळानं कारवाईचा इशारा दिलाय. मात्र कारवाई होत नसल्यानं या शाळा शिक्षण मंडळाला जुमानत नसल्याचं चित्र आहे.