www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतले होते. पण शिष्यवृत्तीसाठीच्या गुणांची पात्रता महापालिकेनं अचानक वाढवली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका दहावीमध्ये ८० ते ८५ टक्के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना २५ हजार, ८५ ते ९० टक्के मिळवणा-यांना ५० हजार तर ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-याना १ लाख रुपये बक्षीस देत होती.
पण अचानक या नियमांत बदल करण्यात आलाय. ८५ टक्क्यांच्या पुढे २५ हजार, ९० टक्क्यांच्या पुढे ५० हजार आणि ९५ टक्क्यांच्या पुढे १ लाख रुपये देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीनं घेतलाय. या निर्णयाला जोरदार विरोध होतोय.दुसरीकडे याबाबत फेर विचार करण्याचं आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आलंय. ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थिनींना संगणक देण्याचा निर्णयही महापालिकेनं घेतला होता. तोही अजून लाल फितीत अडकलाय.
एकीकडे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक निर्णय घेतल्याचं महापालिका नुसतं दाखवतेय, पण त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळतच नाही.