विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार फर्ग्युसन कॉलेजमध्ये उघडकीस आलाय.
प्रॅक्टीकलच्या नावाखाली उशीरापर्यंत कॉलेजमध्ये थांबवून ठेवल्याची तक्रार काही मुलींनी केली होती. शिवाय प्राध्यापकांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप विद्यार्थिनींनी केलाय. या घटनेला दोन महिने उलटल्यानंतर महाविद्यालयानं संबधित प्राध्यापकांवर कारवाई केलेली नाही. यामुळं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. धरणं देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं महाविद्यालयातील वातावरण तंग झालं होतं.
पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढली. शेवटी प्राचार्यांनी बारा जानेवारीपर्यंत प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घेतलं