फीचे जड झाले ओझे...

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या फीमध्ये झालेल्या वाढीने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Updated: Nov 8, 2011, 01:00 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या फीमध्ये झालेल्या वाढीने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

 

तंत्र शिक्षण संचालनालयाला सादर केलेल्या माहितीनुसार पन्नास टक्के किंवा ६५,००० विद्यार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. राज्यातील शहरी भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना नामांकित व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची आकांक्षा आहे. पण वाढत्या खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना एकतर शैक्षणिक कर्जाचा मार्ग पत्करणं किंवा उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नाचा नाद सोडून देणं हेच पर्याय आहेत.

 

औरंगाबादच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २००६ साली वार्षिक फी १८,१७० रुपये होती, त्यात वाढ होऊन ती ५०,००० रुपये झाली आहे. पुण्याचे सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी सहा वर्षांपूर्वी ५९,००० रुपये फी आकारत होते. ते आज ९२,००० रुपये झाले आहेत.

 

फीमध्ये झालेली वाढ रोखायला हवी तिचं समर्थन करता येणार नाही असं मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त व्यक्त केलं आहे. अनेक अभियांत्रिक महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा तसंच अद्यावत ग्रंथालयांची सुविधा उपलब्ध नाही. शिक्षण शुल्क समितीला जादा अधिकार आणि अधिक कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन दिला तर समिती महाविद्यालयांची काटेकोर तपासणी करु शकेल. महाविद्यालय सुविधांबाबत जे दावा करतात त्याहून वास्तव परिस्थिती निराळी असते. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न तीस ते चाळीस हजार रुपयांदरम्यान असतं त्यांना प्रवेश घेण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो. हल्ली बहुतांशी महाविद्यालयांचे व्यवस्थापन राजकारण्यांच्या हातात असल्याने वाढत्या फीवर नियंत्रण कोण ठरवणार हा मोठा कळीचा प्रश्न आहे.