विकास भदाणे, जळगाव
किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असाह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाल्यानं दोन जीवांची नवी पहाट उदयास आली आणि एका अनोख्या लग्नाची गोष्ट झाली.
असह्य आजारामुळे जीवनातील गोडी कमी होते. मात्र अशा काही रुग्णांच्या जीवनात पुन्हा सुखाची पहाट उजाडते. आणि मग एका नव्या जीवनाला सुरवात होते. जळगावातील किशोर सुर्यवंशी याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. मुंबईत उपचार सुरु असतानाच किशोरची ओळख आरती काशिकर या बऱ्हाणपूरच्या मुलीशी झाली. तिचीही व्यथा किशोर सारखीच होती. ओळखीचं रुपांतर गाठिभेटीत होत गेलं. वारंवार भेटी होत असतानाच विवाहबंधनाच्या दिशेने कधी पाऊल पडलं हे त्यांना सुद्धा कळंल नाही. नवीन जीवनाच्या प्रवासासाठी स्वप्नांचं गाठोडं घेऊन हे दोघे जीवाभावाचे साथीदार मार्गस्थ झालेत.
भावाचा संसार फुलवण्यासाठी बहिणीनं तर मुलीच्या सुखी संसार पाहण्यासाठी आईनं किडनी दान केली. भावाच्या संसारासाठी किडनी दान करणा-या छायानं स्वत: मात्र अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर तीनं किडनी फाऊंडेशन स्थापन केलं. आणि समाजातल्या अनेक रुग्णांना मदत करण्याचं व्रत स्वीकरून नवा आदर्श निर्माण केलाय.
[jwplayer mediaid="25069"]