www.24taas.com, रायगड
गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवलाय. त्यामुळं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून इतिहासावरून पुन्हा - पुन्हा वाद का उफाळून येत आहे? आपण खरंच ऐतिहासिक वारसा जपतोय का? गड - किल्ल्यांच्या पडझडीला कोण आहे जबाबदार? याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात – ‘इतिहास, वाद आणि वास्तव’मध्ये...
वाद पुतळ्याचा
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरून वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवलाय. पण त्यांनी तो पुतळा का आणि कसा हटवला... नेमकं हे प्रकरण काय आहे? रायगडावरील हा बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला गेलाय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा ह़टवलाय. गेल्या दोन वर्षांपासून हा पुतळा वादग्रस्त ठरला होता. रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं लावून धरली होती. मात्र, राज्य सरकारने संभाजी ब्रिगेडची ती मागणी धुडकावून लावली होती तसंच त्याच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पण, अखेर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो पुतळा हटवलाय. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवल्यामुळं हा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. वाघ्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, अशी मागणी आता शिवसेनेनं केलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्यासंदर्भात कोणताच उल्लेख नसल्याचं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी वाघ्याचा पुतळा हटविण्याची मागणी केली होती. ज्या ठिकाणी वाघ्याचा पुतळा बसविण्यात आला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेबांचं स्मारक असल्याचा दावाही काही इतिहास संशोधकांनी केला होता. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार हे स्पष्ट झालं होतं. तसेच सरकारने वाघ्याच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण दिलं होतं. मात्र, पोलीस संरक्षणात असलेला वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवल्यामुळे आगामी काळात हे प्रकरण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाद दादोजींच्या पुतल्याचा...
संभाजी ब्रिगेडनं वाघ्याचा पुतळा हटवला असला तरी वादातून राज्यात पुतळा हटवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्यात आलाय. मात्र, तो पुतळा महापालिकेनं हटवलाय. दादोजीचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा पुणे महापालिकेनं रातोरात हाटवला होता. त्याला आता दीड वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. पुणे महानगरपालिकेने तो पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला होता. पोलीस संरक्षणात महापालिकेनं ती कारवाई केली होती. पण तो पुतळा हटवण्यापूर्वी राज्यात त्यावरून बराच गदारोळ उडाला होता. लाल महालातील दादोजींचा पुतळा हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. दादोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडनं तो पुतळा हटवण्याची मागणी केली होती. तसेच त्यासाठी आंदोलनही केलं होतं. तसेच निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर पुणे महापालिकेनं पुतळा हटवण्याची करवाई केली. १९८८ मध्ये पुणे महापालिकेनंच एक ठराव करुन लालमहालात ते शिल्प बसवलं होतं. पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरणाऱ्या बालशिवाजींसोबतच माता जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव असं ते समूहशिल्प उभारण्यात आलं होतं. पण दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि ते शिल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलं. संभाजी ब्रिगेडने ती मागणी सतत लावून धरली होती. शिवसेना-भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी लालमहालातून दादोजी कोंडदेव यांच