नर्सरी, ज्युनिअर केजी वर्गांच्या प्रवेश अर्जांना सुरूवात झाली आहे. कुलाब्याच्या सेंट एना शाळेने प्रवेश अर्ज देतानाच श्रीमंत-गरीब असा भेद दाखवायला सुरूवात केली आहे. केवळ श्रीमंत भागातल्या विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात येत आहे. तर गरीब भागातल्या विद्यार्थ्यांना अर्ज देण्याचं चक्क नाकारण्यात येत आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळावा म्हणून तासन् तास रांगेत उभे आहेत. पण, शाळा प्रशासनाने मात्र त्यांना प्रवेश अर्ज देण्यास नकार दिला आहे. शाळा प्रशासनाने पेडर रोड, चर्चगेट, नेपियन्सी रोड यांसारख्या श्रीमंत वस्तीतल्या प्रवेश अर्ज मिळतील असं फर्मान सोडलंय. त्यामुळे माझगाव, चिराबाजार, क्रॉफर्ड मार्केट अशा तुलनेने गरीब वस्तीतल्या विद्यार्थ्यांना या श्रीमंतांच्या शाळेत प्रवेश मिळणार नाही.
सेंट एना स्कूलने खरंतर यासंदर्भात पालकांसाठी नोटीस बोर्डच लावला होता. परंतु, झी २४ तासची टीम शाळेत पोहोचल्यानंतर शाळेतल्या शिपायाने नोटीस बोर्ड ताबडतोब हटवला. पालकांनी या प्रश्नावर गोंधळ घालायला सुरूवात केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका बाहेर आल्या. पण, आरडाओरडा करत पालकांच्या प्रश्नांना आणि झी २४ तासच्या वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देताच परत निघून गेल्या.
शाळेपासून १ किमीच्या अंतरातच विद्यार्थ्यांचे घर असावे असा नियम दाखवून शाळा प्रशासन प्रवेश अर्ज द्यायला नकार देत आहे. मात्र पेडर रोड, नेपियन्सी रोड हे परिसर शाळेपासून १ किमीपेक्षा लांब असूनदेखील तेथील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. शाळेच्या अशा पद्धतीमुळे लहान मुलांमध्ये आत्तापासूनच गरीबी-श्रीमंतीचा विचार बिंबवला जात आहे याचा विचारही करणं गरजेचं आहे.