www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम बिनबोभाटपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले की, अशा अवैध हॉस्पिटल्सकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो. अक्षरशः झोपडपट्ट्यांमध्ये ही अवैध नर्सिंग होम्स थाटण्यात आलीत. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृत हॉस्पिटल्सवर आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
गोवंडीच्या शिवाजी नगरमधील ‘विकास नर्सिंग होम’... वरचे २ मजले अनधिकृत... परवानगी नसतानाही याठिकाणी बिनधास्त आयसीयू सुरुय... पण आयसीयूसाठी कुठलेही तज्ज्ञ डॉक्टर इथं नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे एक युनानी डॉक्टर भलत्याच्याच परवान्यावर हे हॉस्पिटल चालवतोय. हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या कुठल्याही सोयी नाहीत. फायर सेफ्टीचे नियम जणू इथं लागूच नाहीत. वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या जिन्यातून जेमतेम एकच व्यक्ती जाऊ शकते... यापेक्षा खुराडे अधिक बरे म्हणायची अवस्था...
हे झालं एक उदाहरण... अशी अवस्था जवळपास सगळ्याच बेकायदेशीर नर्सिंग होमची आहे. याच परिसरात अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या ‘नवजीवन हॉस्पिटल’मध्ये मे महिन्यात शबाना परवीन या महिलेचा आणि तिच्या नवजात अर्भकाचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी हे हॉस्पीटल बंद केलं. परंतु आठवडाभरात त्याच ठिकाणी ‘राजा हॉस्पिटल’ या नव्या नावानं ते सुरु झालं.
मुंबई महापालिकेच्या एम वॉर्डमध्ये म्हणजे गोवंडी-मानखुर्द भागात २२ हॉस्पिटल्स कुठलीही नोंदणी नसताना सुरु आहेत. म्हणजे किमान शंभरहून अधिक खासगी हॉस्पिटल्स नियम धाब्यावर बसवून मुंबईत सुरु असल्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.
या अवैध हॉस्पिटल्सवर कारवाई कुणी करायची हा खरा प्रश्न आहे. कारण मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस यासंदर्भातील जबाबदारी एकमेकांवर ढकलतायत. अवैध हॉस्पिटल्सवर कारवाईचे अधिकार आपल्याला नसल्याचा दावा हे दोघंही करतायत. अशा अवैध हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय की काय, असा सवाल सामान्य मुंबईकर करतायत.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना तर अशा महत्वपूर्ण विषयावर बोलायलाही वेळ नाहीय. एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला जाग येत नाही हेच खरं, असंच म्हणावं लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ