www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय. रामदेवबाबा यांना १६ मे पर्यंत लखनऊमध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
राहुल गांधी `हनीमून आणि पिकनिक`साठी दलितांच्या घरी जातात, अशा स्वरुपाचं वक्तव्य योगगुरू रामदेवबाबांनी केलं होतं. त्यावर बरीच टीका झाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रामदेवबाबांविरोधात निदर्शनंही केली. त्यानंतर दलित बांधवाच्या भावना दुखवायचा माझा उद्देश नव्हता, मात्र राहुल गांधी गरिबीचं पर्यटन करतात हे सांगायचं होतं असं रामदेव बाबांनी म्हटलं. यातून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं सांगत रामदेव बाबांनी माफी मागितली होती.
मात्र आता रामदेवबाबांना १६ मे पर्यंत लखनऊमध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यास तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळं रामदेवबाबांना १६ मे पर्यंत लखनऊमध्ये राजकीय हेतूसाठी योग शिबिर, पत्रकार परिषद अथवा सभा घेता येणार नाही. याआधीच उत्तर प्रदेश पोलिसांनी रामदेवबाबा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.