www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
ही अटक टाळण्यासाठी राम कदम फरार झाले असल्याचं, पार्कसाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास गायकवाड यांनी सांगितलंय.
पोलिसांनी कदम आणि त्यांच्या 30 कार्यकर्त्यांविरोधात अँट्रॉसीटी, अपहरण, मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी अशा गंभीर गुन्हय़ांची नोंद केलीय.
विक्रोळी, घाटकोपर आणि कांजुरमार्ग परिसरात कदम यांच्या नावाने लावलेल्या पोस्टर्सवर त्यांनी श्रीलंकेहून बुद्धांच्या अस्थी आपल्या निवासस्थानी आणल्या आहेत असं सांगण्यात आलं. तसेच या अस्थींचे दर्शन 18 ते 20 एप्रिल दरम्यान कदम यांच्या निवासस्थानी घेता येईल, अशी माहिती होती.
याला भारिप बहुजन महासंघाच्या तीन कार्यकर्त्यांनी विरोध करून अस्थींबाबत संशय व्यक्त केला. तेव्हा कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या तीन जणांना डांबून बेदम मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कदम यांच्या तीन कार्यकर्त्यांना गजाआड केले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कदम यांच्या घराभोवती पहारा दिला आहे. या आधी विधिमंडळ गॅलरीत एका पीएसआयला झालेल्या मारहाण प्रकरणी आमदार राम कदम यांना अटक झाली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.