'गुलजार'अन् 'कविता'ला मतदान नाकारले

प्रसिध्द ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचे मुंबईतील मतदान यादीतून नाव गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर ठाण्यात पूर्वी राहणारी मात्र, लग्नानंतर मुंबईकर झालेली अभिनेत्री कविता लाड-मेढेकर हिला मतदानापासून रोखण्यात आले.

Updated: Feb 16, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

प्रसिध्द ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचे मुंबईतील मतदान यादीतून नाव गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर ठाण्यात पूर्वी राहणारी मात्र, लग्नानंतर मुंबईकर झालेली अभिनेत्री कविता लाड-मेढेकर हिला मतदानापासून रोखण्यात आले. केवळ ओळखपत्र नसल्याचे कारण देऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी तिला मतदानच करू दिले नाही.

 

 

मूळची ठाणेकर असलेली कविता तिथल्याच मतदार यादीत नाव असल्यामुळे ठाणे मनपात मतदानाचा हक्क बजावणार होती. आपला हक्क बजावण्यासाठी ती मुंबईहून मुद्दाम ठाण्यात आली होती. मात्र मतदार यादीत नाव असूनही निव्वळ ओळखपत्र विसरल्यामुळे तिला मतदान करता आले नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, ओळखपत्र दाखवल्याशिवाय मतदान करता येत नाही . या नियमाचा आधार घेत निवडणूक अधिका - याने कविता लाडला रोखले.

 

 

कविता लाडचे मतदार यादीत नाव आणि फोटो याची माहिती आहे. मतदानकेंद्रावरील अनेकांनी मला ओळखले आणि मी याच भागातील मतदार असल्याचे सांगितले. पण निव्वळ नियमावर बोट ठेवून निवडणूक अधिका-याने रोखले. मी ओळखपत्र आणले नाही, ही माझी चूक होती. परंतु अनेकांनी मला ओळखले. असे असतानाही मला माझा मतदानाचा हक्क बजावता आला नाही. हा नियम बोगस मतदान रोखण्यासाठी आहे का की, आपला हक्क बजावू इच्छिणा-यांसाठी आहे, असा सवाल कविताने केला आहे.

 

 

तर प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना मात्र मतदानाचा हक्क बजावता आला नाही. पाली हिल इथल्या मतदान केंद्रावर गुलजार मतदानासाठी गेले, पण तिथल्या मतदारयादीत त्यांचं नावच नव्हतं. मतदान करता न आल्यामुळे माझी निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया गुलजार यांनी व्यक्त केली.

 

कविता ला़ड ओळखपत्र नसल्याने मतदानापासून वंचित राहिली. ही तिची चूक तर गुलजार यांच्याबाबतीत निवडणूक अधिका-यांची चूक आहे. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असताना मग याला जबाबदार कोणाला धरायचे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.