दक्षिण मुंबई मतदार संघात कोण जिंकणार?

दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणाराय.

Updated: Mar 28, 2014, 10:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणाराय.
उमेदवार जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि मनसेनं प्रचारात आघाडी घेतलीय. तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा भर बैठकांवर दिसून येतोय. शिवसेना-मनसेतील मतविभागणीचा फायदा यावेळीही काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
अमराठी मतदारांची संख्या अधिक असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
शिवडीत मनसेचा, भायखळा, मुंबादेवी आणि कुलाबामध्ये काँग्रेसचा, वरळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मलबार हिलमध्ये भाजपचा आमदार आहे.
इथं आपने मिरा संन्याल यांना मैदानात उतरवलं असलं तरी खरी लढत ही काँग्रेसचे मिलिंद देवरा, शिवसेनेचे अरविंद सावंत आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामध्येच होत आहे.
मागील वेळी या मतदारसंघात तिस-या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेनं यावेळी सार्वजनिक निवडणुकांचा अनुभव नसलेले परंतु स्वच्छ प्रतिमेचे अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सध्या प्रचारात सर्वाधिक आघाडी शिवसेनेनं घेतली असून सावंत यांनी प्रचारफेरींचा धडाका लावला आहे. 
खास प्रचारासाठी बनवलेल्या रथातून ते गल्लोगल्ली प्रचार करत असून भाजपचे स्थानिक नेतेही या प्रचारात आघाडीवर असल्याचं सध्यातरी चित्र आहे. शिवसेनेची इथं संघटनात्मक बांधणी चांगली असली तरी मोदी फॅक्टरवरच त्यांची भिस्त अवलंबून आहे.  
 
मागील वेळी शिवसेना उमेदवाराला मागे टाकून दुस-या क्रमांकावर राहिलेले मनसे आमदार बाळा नांदगावकरांना यावेळी मात्र पहिला क्रमांक पटकावयाचा आहे. यासाठी दारोदारी जावून मतदारांना भेटण्यावर त्यांचा भर आहे.
शिवसेनेप्रमाणे मनसेनंही इथं प्रचारात आघाडी घेतली असून काँग्रेसची व्होटबँक असलेल्या झोपडपट्टयांमध्ये त्यांनी जादा जोर लावला आहे. काँग्रेसविरोधी लाटेचा फायदा आपल्यालाच होईल असा त्यांचा दावा असला तरी राज ठाकरेंचा करिष्मा कितपत चालतो. यावरच त्यांचे यश अवलंबून असेल.
 
शिवसेना-मनसेच्या मानाने काँग्रेसनं प्रचारात आघाडी घेतली नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बैठकांचे सत्र मात्र सुरु आहे. 
केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा सध्या मतदारासंघांमध्ये बैठकांच्या माध्यमातून आपले काम पोहचवण्याचं काम करत आहेत. सेना-मनसेतील मतविभागणीमुळं विजय सोपा होईल. या समजुतीमुळं बहुदा काँग्रेस थोडी रिलॅक्स दिसत आहे. 
गुजराती, मारवाडी समाजाचे इथं तीन लाखांहून अधिक मतदार इथं आहेत. जे मागील निवडणुकांमध्ये देवरांच्या पाठिशी राहिलेत. यंदा मोदी फॅक्टरमुळं या व्होटबँकेवर परिणाम होवू शकतो. देवरांना मात्र ते मान्य नाही.
 
शिवसेनेची भिस्त मोदी फॅक्टरवर, मनसेची राज ठाकरेंच्या करिष्म्यावर तर काँग्रेसची शिवसेना-मनसेतील मतविभागणीवर अवलंबून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.