नवी दिल्ली: आम आदमी पार्टीत सध्या जोरदार साठमारी सुरू झालीय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून, आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात.
दिल्लीमध्ये ऐतिहासिक, शानदार विजय मिळवणारी आम आदमी पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. आपमध्ये सरळसरळ दोन गट पडलेत. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि पक्षाचे अंतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास... तर दुसरीकडं केजरीवाल समर्थक... पक्ष सध्या ज्याप्रकारे चालतोय, त्यावरच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. तर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षातून बाहेर काढण्याच्या हालचालीही सुरू असल्याचं समजतंय...
आपचे पक्षांतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास यांनीही अरविंद केजरीवाल यांना एक पत्र पाठवलंय.
त्यामध्ये ७ महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.
१. पक्षामध्ये राष्ट्रीय संयोजक का नाही?
२. पक्षामध्ये सह संयोजकपद का नाही?
३. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही का नाही?
४. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का केलं जातं?
५. मंत्रिमंडळात एकही महिला का नाही?
६. पक्षामध्ये अविश्वासाचे वातावरण का?
७. पीएसी-कार्यकारिणीची पुनर्रचना का नाही?
हे सवाल मीडियामध्ये लीक होताच पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. त्याशिवाय प्रशांत भूषण यांनीही एक पत्र लिहलंय. पारदर्शकता, तिकीट वाटपातला सावळागोंधळ आणि अंतर्गत लोकशाही याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
आप हा पक्ष कुणीतरी हुकूमशहा चालवतोय की काय, अशी शंका प्रशांत भूषण यांनी या पत्रात व्यक्त केली होती. मात्र आपकडून याचा इन्कार केला जातोय.
दरम्यान, पक्षामध्ये मोठे मतभेद असल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनीही फेटाळलाय. मात्र योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे केजरीवालांच्या विरोधात कारवाया करत असल्याची टीका पक्षातलेच काही नेते करतायत.
आपमध्ये या लाथाळ्या सुरू झाल्यानं विरोधकांच्या मनात मात्र लाडू फुटतायत. आप खरोखरच व्यक्तीकेंद्रित पक्ष बनतोय का? केजरीवालांच्या शिवाय आपची कल्पनाच करता येत नाही. याचाच अर्थ केजरीवाल हे लोकपालपेक्षाही मोठे झालेत का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.