कोर्टात 5 पैशांसाठी 41 वर्षांचा लढा

दिल्ली परिवहन महामंडळातील कंडक्टरवर पाच पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप 1973 मध्ये झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन लढा मागील 41 वर्षांपासून सुरू असल्याचं समोर येत आहे.

Updated: Jul 28, 2014, 11:27 PM IST
कोर्टात 5 पैशांसाठी 41 वर्षांचा लढा title=

नवी दिल्ली : दिल्ली परिवहन महामंडळातील कंडक्टरवर पाच पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप 1973 मध्ये झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन लढा मागील 41 वर्षांपासून सुरू असल्याचं समोर येत आहे.

दिल्ली परिवहन महामंडळाला दरवर्षी 1 हजार कोटी रूपयांचा तोटा आहे. मात्र या पाच पैशांसाठी दिल्ली परिवहन महामंडळाने पाच पैशापेक्षा जास्त पैसा आणि वेळ घालवल्याचं समोर आलं आहे.

दिल्ली परिवहन महामंडळाच्या रणवीर सिंह या वाहकाने 1973 मध्ये एका महिलेला 10 पैसे तिकीट आकारणी केली. या वेळी बसमध्ये आलेल्या तिकीट तपासनिसांना सदर महिलेला चुकीचे तिकीट दिल्याचे लक्षात आले.

ही महिला प्रवास करत असलेल्या मार्गातील बसभाडे 15 पैसे होते. मात्र सिंह यांनी तिला 10 पैशांचे तिकीट देऊन परिवहनचे पाच पैशांचे नुकसान केले, असं तपासनिसांनी सांगितलं आणि कंडक्टरला दोषी ठरविलं.

याप्रकरणी विभागाकडून केलेल्या चौकशी करण्यात आली. यात रणवीर सिंह दोषी आढळले, रणवीर यांच्याकडून अशा चुका वारंवार होत असल्याने त्यांना 1976 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं.

रणवीर सिंह यांनी आपल्याला या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न होत असून, दिल्ली परिवहन महामंडळाने घेतलेल्या निलंबनाच्या निर्णयाला कामगार न्यायालयात आव्हान दिले होते.

याप्रकरणी 1990 मध्ये न्यायालयाने सिंह यांच्या बाजूने निकाल देत दिल्ली परिवहनला सिंह यांना पुन्हा कामावर घेऊन त्यांचा संपूर्ण थकीत पगार देण्याचे आदेश दिले. परंतु परिवहनने या निर्णयास न जुमानता दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने ही याचिका 2008 मध्ये फेटाळली. यानंतर सिंह यांनी निवृत्तीनंतरचा लाभ आणि थकीत पगार मिळण्याची विनंती केली, परंतु त्यासही परिवहनने नकार दिला होता.

न्यायालयासमोर नव्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिल्ली परिवहनने आपली भूमिका कायम ठेवत सिंह यांना शिक्षा होण्याची आशा व्यक्त केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. या प्रकरणात काय होईल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.