नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी जवानांच्या दिल्या जात असलेल्या निकृष्ठ जेवणाचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर शेअर केल्यानंतर सगळा देश ढवळून निघाला. या व्हिडिओनंतर आता सीआरपीएफच्या (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
सीआरपीएफ जवान जीत सिंह यानं आपल्या व्हिडिओत जवानांच्या पेन्शनचा मुद्दा उचललाय. सीआरपीएफ जवानांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवलाय.
सीआरपीएफ डीजी दुर्गा प्रसाद यांनी यावर स्पष्टीकरण देत, जवानांनी जे काही मुद्दे उचललेत ते अगोदरच सरकारसमोर मांडण्यात आलेत. आर्मीच्या जवानांना ज्या काही सुविधा मिळतात त्या सर्व आम्हालाही मिळतात. सर्व मुद्दे सातव्या कमिशनसमोर माडंण्यात आलेत. 2004 नंतर पेन्शन मिळणं बंद झालंय. परंतु, आम्ही स्किल डेव्हलमेंटची ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे रिटायरमेंटनंतही जवानांना नोकरीची संधी मिळू शकेल.
सीआरपीएफनं या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ 16 ऑक्टोबर 2016 चा आहे. सध्या जवानांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
दरम्यान, देशाच्या सुरक्षा सांभाळणाऱ्या जवानांसोबत कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही... बीएसएफ जवानानं केलेल्या आरोपांनंतर सरकारनं अहवाल मागवलाय... त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलंय.