www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याचा अहवाल सादर केलाय. यामध्ये बीसीसीआयचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांच्या जावयाचा - गुरुनाथ मयप्पनच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलाय.
न्यायमूर्ती मुद्गल यांच्या अहवालात, गुरुनाथ मयप्पन याच्याविरोधात सट्टेबाजीचा आणि इतर आरोपींना सूचित करण्याचा आरोप सिद्ध होतोय, असं म्हटलंय.
फिक्सिंगच्या आरोपांची आणखी सविस्तर चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचाही या अहवालात उल्लेख करण्यात आलाय. मयप्पन हा चेन्नई सुपरकिंग्सचा चेहरा म्हणून ओळखला जात होता. या अहवालानं, मयप्पन हा केवळ एक क्रिकेटप्रिय व्यक्ती असल्याचा एन श्रीनिवासन यांनी केलेला दावा खोडून काढलाय.
सुप्रीम कोर्टात सोपविण्यात आलेल्या अहवालानुसार, राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांच्याविरुद्धही स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांची आणखी चौकशी करण्याची आवश्यकता आहे. बीसीसीआयनं भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग प्रकरण हाताळण्यासाठी सेवानिवृत्त सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची भरती करावी, असा सल्लाही या अहवालात देण्यात आलाय.
समितीनं कोर्टाला एका बंद पाकिटात चौकशीदरम्यान समोर आलेल्या नावं दिली. बीसीसीआय प्रमुख पदावर श्रीनिवासन यांचं असणं तसंच आयपीएल फ्रँचायझीच्या मालकांच्या अधिकारांची सीमारेषा एक गंभीर मुद्दा आहे, यावर न्यायालयानं विचार करावा.. असं सांगता समितीनं क्रिकेटला भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाकडे १० उपाय सुचवलेत.
अहवालात सचिन तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, व्ही. प्रसाद, कुंबळे या अनुभवी खेळाडुंनी युवा खेळाडुंना फिक्सिंगपासून दूर ठेवण्यासाठी सल्ला द्यावा, असंही म्हटलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.