www.24taas.com, नवी दिल्ली
भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळजवळ ६३ हजार जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता युवकांना नक्कीच चांगली संधी उपलब्ध आहे. यंदा देशभरातील बँकांमधील ६३, २०० पदे भरण्याची आणि सर्व किसान क्रेडिट कार्डांचे रूपांतर एटीएम कार्डात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख आणि वित्तीय संस्थाप्रमुखांच्या बैठकीत केली.
देशातील तरुण पुरुष आणि महिलांना बँकांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ८४ हजार ४८९ जागा भरायच्या होत्या. ६३ हजार २०० रिक्त जागा २०१२-१३ या आर्थिक वर्षात भरण्यात येणार आहेत.
यात क्लार्कपासून अधिकारी पदापर्यंतच्या जागा भरण्यात येतील. आपले करीअर घडविण्यासाठी युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा. खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये कर्मचारी भरतीही लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती चिदंबरम यांनी बैठकीनंतर दिली.