www.24taas.com झी मीडिया , नवी दिल्ली
तुमचे परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन नसेल तर नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता ओळख द्यावी लागणार आहे. येत्या ३ फेब्रुवारीपासून पॅन मिळण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आधी पॅन मिळण्यासाठी कटकट नव्हती ती आता सुरू होणार आहे.
येत्या ३ फेब्रुवारीपासून पॅन नंबर मिळवू इच्छिणार्यांना पूर्वीप्रमाणे जन्मतारीख आणि पत्त्याच्या पुराव्याखेरीज आयडेंटिटी प्रूफ (ओळख) ही द्यावे लागणार आहे. मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स यासारखे पुरावे यासाठी ग्राह्य असणार आहेत. प्राप्तीकर खात्याच्या परमनंट अकाऊंट नंबरसाईठी सरकारने ज्यावरून ओळख पटेल असा दस्तावेज (आयडेंटिटी प्रूफ) देणे सक्तीचे केल्याने आणि तपासून पाहाण्यासाठी मूळ कागदपत्रेही सादर करणे सक्तीचे केल्याने येत्या महिन्यापासून नागरिकांना `पॅनकार्ड` काढण्यासाठी पूर्वीहून थोडे जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत.
पासपोर्ट काढण्यासाठी जशी कागदपत्रे दिली जातात तशीच अर्जदाराने स्वाक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) कागदपत्रे पॅनकार्ड काढून देणार्या केंद्रांवर (फॅसिलिटेशन सेंटर) सादर करावीत. तसेच ज्या कागदपत्रांच्या छायाप्रती दिल्या असतील ती मूळ कागदपत्रेही सोबत ठेवावी लागणार आहेत. छायाप्रती मूळ दस्तावेजासोबत पाहून लगेच परत केली जातील. पासपोर्टसह इतरही काही महत्त्वाचे दस्तावेज मिळविण्यासाठी पॅनकार्ड पुरावा म्हणून दिले जात असल्याने अर्जदाराच्या ओळखीविषयी पक्की खात्री व्हावी यासाठी ही नवी पद्धत सुरू करण्यात येत आहे, या नव्या नियमांची माहिती देताना केंद्रीय वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
पॅनकार्डचा पत्ता बदलून घ्यायचा असेल त्यांनाही हे नवे नियम लागू होतील, असेही वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अनेक व्यक्तींनी पॅनकार्ड घेऊन १० किंवा त्याहूनही अधिक वर्षे झाली आहेत आणि दरम्यानच्या काळात त्यांचे पत्तेही बदलले आहेत. कायद्यानुसार त्यांना बदललेला पत्ता देऊन नवे कार्ड घेणे गरजेचे असल्याने ते घेण्यासाठीही नव्या कार्डाप्रमाणेच सर्व कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील. तरच हे कार्ड मिळेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.