ऐतिहासिक... मृत्यूनंतरही उमेदवार होणार विजयी?

लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 5, 2014, 10:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अलागड्डा
लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे... आंध्रप्रदेशात निवडणुकीत एका उमेद्वाराच्या मृत्यूनंतरही त्याच्या नावावर मतदान होणार आहे... आणि जर हा उमेदवार निवडूण आला तर तो मरणोत्तर विजयी होणारा पहिला उमेदवार ठरणार आहे... ही भारताच्या लोकशाहीतील आणि निवडणूक इतिहासातील उल्लेखनीय घटना ठरणार आहे.
आंध्रप्रदेशात ऐतिहासिक निवडणूक
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत अलागड्डा या मतदार संघातून वायएसआर काँग्रेसच्या तिकीटावरून शोभा नागी रेड्डी उभ्या राहिल्यात. मात्र, गेल्या 24 एप्रिलला एका प्रचारसभेतून घरी परतताना शोभा रेड्डी यांच्या कारला झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. शोभा रेड्डी यांचा मृत्यू झाला असला तरी निवडणुकीच्या नवीन कायद्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे नाव कायम राहणार आहे. शोभा रेड्डी यांनी याच मतदारसंघातून गेल्या चार वेळा आमदारकी मिळवलीय.
त्यामुळेच, मृत्यूपश्चात शोभा रेड्डी यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या मुलांनी आणि पतीनं आपल्या हातात घेतलीय. मृत्यूनंतरही शोभा रेड्डी यांचाच विजय व्हावा यासाठी ते जीवाचं रान करत आहेत. भुमा अखिला प्रिया, भुमा मौनिका व भुमा जगत विख्यात रेड्डी ही शोभा रेड्डी यांची मुलं मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात दाखल होऊन आपल्या मृत आईच्या विजयासाठी लोकांकडे मतांचं दान मागत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील भुमा नागी रेड्डीदेखील हजर असतात.
मृत आईच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी दाखल होणाऱ्या या मुलांना कोणत्याही घोषवाक्याची गरजच पडलेली नाही. जनतेच्या मनातील प्रचंड सहानुभूतीच त्यांना विजयाची खात्री देऊन जातेय.
आंध्रप्रदेशात 7 मे रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या मतदानयंत्रातील मतपत्रिकेतून वासएसआरसीच्या उमेदवार शोभा नागी रेड्डी यांचं नाव वगळण्यात येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं याआधीच स्पष्ट केलंय. निवडणूक नियमानुसार शोभा रेड्डी विजयी झाल्यास या मतदारसंघात नंतर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात येईल. त्या वेळी शोभा रेड्डी यांच्या कुटुंबातील कोणत्याही पात्र उमेदवाराला निवडणूक लढविता येईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, 1961 च्या निवडणूक कायद्यातील नियम 64 अंतर्गत शोभा रेड्डी यांचे नाव मतदानयंत्रात राहू शकते; एवढेच नाही, तर त्यांच्या नावाने मतदानही होऊ शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.