नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आहे कामाची बातमी. पीएफची रक्कम आणि पेन्शन झटपट मिळवणे आता आणखी सुलभ होणार आहे. यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव, त्यासाठी होणारी धावपळ आता संपणार आहे. कारण ही कामं लवकरच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
येत्या मे महिन्यापासून पीएफची रक्कम आणि पेन्शन ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पीएफ काढण्यासाठीचा अर्ज, पेन्शन काढणे यासंदर्भातले दरवर्षी जवळपास एक कोटी अर्ज येतात. त्यांच्यावरील प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होण्यासाठी 123 फिल्ड ऑफिसेसना केंद्रीय सर्व्हरशी जोडण्याचे काम सध्या सुरु आहे.
सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाईन करता यावेत यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ईपीएफओ आयुक्त व्ही.पी.जॉय यांनी सांगितलंय. अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यावरील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.