नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली.
सर्व खासदारांचं निलंबन झालं तरी बेहत्तर, पण सुषमा स्वराज यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतलाय. काँग्रेसच्या 25 खासदाराचं निलंबन ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
मोदी सरकार विरोधात काँग्रेस कमालीची आक्रमक झालीये. खासदारांच्या निलंबना विरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संसदेबाहेर धरणे आंदोलन केलं. फलक आणि काळ्याफिती बांधून काँग्रेस खासदारांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. सरकारकडून सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होतेय, देशातल्या जनतेची मन की बात सरकारनं ऐकली पाहिजे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केलाय.
काँग्रेसचा पाच दिवस लोकसभेवर बहिष्कार आहे. खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. धरणं आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सर्वांसह काँग्रेसचे खासदार उपस्थित आहेत. सरकार निलंबनाची खेळी खेळून एकतर्फी सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.