नवी दिल्ली : बळजबरी धर्मांतराच्या मुद्यावर आज चौथ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं आहे. दरम्यान एका काँग्रेस सदस्य़ाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.
बळजबरीने करण्यात आलेले धर्मांतर आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर समस्त विरोधी पक्ष ठाम राहिल्याने आणि सरकारने ही मागणी अमान्य केल्याने सलग चौथ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले.
या दरम्यान काल काँग्रेसचे सदस्य हनुमंता राव यांना नियम २५५ अन्वये संपूर्ण दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान गदारोळामुळे राज्यसभेत विमा विधेयक मांडण्यात सरकारला अपयश आले. आता हे विधेयक लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते.
दरम्यान, राज्यसभेत काल प्रचंड गदारोळातच विमान अपहरण निवारण दुरुस्ती विधेयक २०१४ ध्वनी मताने मंजूर करण्यात आले. तसेच दुसरे एक संबंधित विधेयक मागे घेण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.