नवी दिल्ली : संसदेवरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलंय.
फुटीरवादी नेत्यांनी अफजल गुरूच्या अस्थिंची मागणी करत जम्मू-काश्मीर बंद करण्याची घोषणा केलीय.
अफजल गुरु याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी देण्यात आली होती. तेव्हापासूनच काश्मीरच्या खोऱ्यात गुरूच्या अस्थिंसाठी आंदोलन सुरू आहे.
तसंच ११ फेब्रवारी रोजी मकबूल भटला फाशीवर चढवल्याचा विरोध म्हणूनही बंदची घोषणा करण्यात आलीय. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक भट याला ११ फेब्रवारी १९८४ रोजी फाशी देण्यात आली होती. भट याला काश्मीर खोऱ्यात एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याच्या हत्येचा दोषी ठरवण्यात आलं होतं.
भट आणि गुरु दोघांनाही फाशी दिल्यानंतर त्यांचे अवशेष जेलच्या आतल्या भागातच दफन करण्यात आले होते.
फुटीरतावादी नेत्यांच्या या भूमिकेमुळे या भागात मोठ्या संख्येत सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार ९, १० आणि ११ फेब्रुवारी रोजी काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत कर्फ्यु लावण्यात आलाय.