ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, सर्व एटीएम बंद

 जगाच्या अर्थव्यस्थेला 2008 नंतर पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. युरोपियन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

Updated: Jun 29, 2015, 09:00 AM IST
ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, सर्व एटीएम बंद title=

अथेंन्स :  जगाच्या अर्थव्यस्थेला 2008 नंतर पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. युरोपियन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

आज ग्रीसमधली सगळी एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसात ग्रीसच्याच जनतेनं अडीच अब्ज युरो एटीएममधून काढून घेतले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी जाहीर केलंय. 

अथेंन्समध्ये झालेल्या ऑलिंम्पिकनंतर ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला. सध्या ग्रीसवर वेगळवेगळ्या कर्जदाराचं 307 अब्ज युरोंचं कर्ज आहे. हे कर्ज देताना ग्रीसच्या सरकारवर खर्च कपातीचे विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. 

सरकारी खर्चात कपात झाल्यानं ग्रीसची अर्थव्यवस्था आणखी डबघाईला आलीय. त्याचाच परिणाम म्हणून सहा महिन्यांपूर्वी काटकरसी थांबवून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं आश्वासन देणारं डाव्या विचाराचं सरकार जनतेनं निवडून दिलंय. पण ग्रीसला कर्ज देणारे देश आणि आतंरराष्ट्रीय नाणे निधी आणखी कर्ज देण्याआधी निर्बंध कमी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रीसवर आता दिवाळखोरीची वेळ आली आहे.

उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं दिलेलं कर्ज फेडण्याची मुदत आहे. पण हे कर्ज फेडण्यासाठी युरोझोनमधले कर्जदार त्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता ग्रीस युरोझोनमधून बाहेर फेकला जाण्याची शक्यताय.  असं झालं, तर फ्रान्स आणि जर्मनी या दोन्ही सर्वात मोठ्या कर्जदारांच्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसणार आहे. त्याचे पडसाद आज भारतासह सगळ्याचं शेअर बाजारात बघायाला मिळतील असा अंदाज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.