www.24taas.com, अटारी
पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय. मायभूमीत परतलेल्या या हिंदूंच्या चेहऱ्यावर आतंकवादाची छाया इतकी गडद आहे की पाकिस्तानात आपण पुन्हा जाऊच, असं ते खात्रीनं सांगू शकत नाहीत.
पाकिस्तानातून परतलेल्या अनिल कुमार यांनी आपण पाकिस्तानात पुन्हा जाणार की नाही, याचा निर्णय आत्ताच घेऊ शकत नसल्याचं सांगितलंय. पाकिस्तानात हिंदूंचं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन सुरू आहे. अपहण, हत्या आणि अपमान आता असह्य झालाय. पाकिस्तानात अजूनही सध्या कमीत कमी ५००० हिंदू कुटुंब आहेत, जे भारतात परतण्याच्या आशेवर आहेत. पण पाकिस्ताना अधिकाऱ्यांनी त्यांना रोखून धरलंय. ज्या हिंदूंनी भारतात प्रवेश केलाय अशा सर्वांची कागदपत्रं आणि दस्तावेज जमा करण्यात आलेत. आपण भारतात स्थायिक होणार नाही, आणि ३० दिवसांच्या आत परत पाकिस्तानात येऊ असं लेखी आश्वासन त्यांच्याकडून घेण्यात आलंय. त्यामुळे त्यांना पुन्हा पाकिस्तानात जावंच लागणार आहे. ज्यांनी आत्तापर्यंत भारतात प्रवेश केलाय अशा अनेक हिंदूंची भारतातच स्थायिक होण्याची इच्छा आहे.
दीर्घकालीन व्हिसाचं आश्वासन...
दरम्यान, पाकिस्तानच्या छळाला कंटाळून भारतात परतलेल्या हिंदूंनी योग्य निकषांनुसार अर्ज केला तर त्यांना दीर्घकालीन मुदतीचा व्हिसा देण्यात येईल, असं आश्वासन भारत सरकारनं गुरुवारी दिलंय. अजून तरी कुणीही दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केलेला नाही, अनेक हिंदू सध्या महिन्याभराच्या व्हिसावर पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिलीय.