एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा

जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.  

Updated: Aug 9, 2014, 08:33 AM IST
एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा title=
फाईल फोटो

वॉशिंग्टन : जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.  

त्याचं झालं असं, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा इराक मुद्द्यावर राष्ट्राला थोड्याच वेळात संबोधित करणार होते. पण, त्याच वेळेस चहूबाजुंनी सुरक्षेनं घेरलेल्या व्हाईट हाऊसमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री जवळपास आठ वाजल्याच्या सुमारास घडली.

तब्बल 132 कॅमेरे असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये अचानक धावपळ सुरू झाली होती... कारण, या व्हाईट हाऊसची कडक सुरक्षा भेदून आपल्या आई-वडिलांपासून वेगळा एक चिमुकला व्हाईट हाऊसमध्ये घुसला होता. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लाऊनमध्ये सुरक्षा चक्राचं उल्लंघन झाल होते. 

हा प्रकार समोर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला निर्णय जाहीर करण्याची प्रक्रिया थांबवली होती. पण, सगळं काही सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर मात्र ओबामांनी अमेरिकी सैन्याच्या फायद्यासाठी आणि इराकमधील संभावित नरसंहार रोखण्यासाठी उत्तर इराकमध्ये इस्लामी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला मंजुरी देण्याचा आपला निर्णय जाहीर केला.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.