मुंबई: क्या कूल है हम 3 शुक्रवारी रिलीज झालीये. उमेश घडगे यांच्या या चित्रपटाची स्टोरी सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदना करीमी आहेत. यांच्याबरोबरच क्लाउडिया सिजेला, कृष्णा अभिषेक, शक्ती कपूर, दर्शन जारीवाल यांनीही काम केल आहे.
सिनेमाचं कथानक
क्या कूल है हम 3 आपल्या आधीच्या सिक्वललाच पुढे घेऊन जातो. संपूर्ण चित्रपटामध्ये डबल मिनींग डायलॉग्सचा भरणा आहे. या चित्रपटात लॉजिक मात्र अजिबात नाही. एकता कपूरनं आपला भाऊ तुषार कपूरसाठीच हा चित्रपट बनवला का हा प्रश्न चित्रपट बघताना वारंवार उपस्थित होतो. तुषार कपूरचा अभिनय आपण याआधीच्या अनेक सिनेमांमध्ये पाहिला आहे, त्यामुळे त्याचा अभिनयावर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं ठरेल.
तुषार कपूर आणि आफताब या चित्रपटामध्ये मित्र दाखवलेत, जे थायलंडमध्ये पॉर्नस्टार्सचं काम करणं सोडून आलेत. या दोघांचा मित्र कृष्णा अभिषेक सेक्स फिल्म्सचा प्रॉड्युसर आणि डायरेक्टर दाखवलाय.
तिच्या नावाबद्दल गॉसिप
चित्रपट सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळात एंट्री होते ती मंदना करीमीची. मंदना या चित्रपटात सुसंस्कृत कुटुंबातली दाखवली आहे. या चित्रपटात तिचं दुसरं नाव आहे, करजात्या. तिचं नाव करजात्या का हे शेवटपर्यंत कोणालाच कळत नाही. त्यानंतर सुरु होतं, तुषार आणि करजात्याचे नातेसंबंध. संस्कारी कुटुंबातून आलेली करजात्या तुषारला आपल्या वडलांना इम्प्रेस करायला सांगते. करजात्या कुटुंबाला इम्प्रेस करण्यासाठी मग हे सगळे पॉर्नस्टार्स एकत्र येतात आणि तिथून सुरु होतो खरा ड्रामा.
अंगप्रदर्शनावर भर
तर दुसरीकडे मंदाना करीमी, जिजेल ठकराल आणि क्लॉडिया सिएसला यांनी अंगप्रदर्शन सोडून या चित्रपटात दुसरं काहीच केलं नाही. आफताब शिवदासानीनं मात्र ठिकठाक काम केलंय. तसं पाहायला गेलं तर या चित्रपटामध्ये बघण्यासारखं काहीच नाही. चित्रपटाचं संगीतही फारसा प्रभाव पाडत नाही, चित्रपटामध्ये गाणी का आहेत हे वारंवार वाटत राहतं, आणि जी गाणी आहेत तीपण डबल मिनींग. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट बघायची फारच इच्छा असेल तरच जा. कुटुंबासोबत हा चित्रपट पाहणं शक्यतो टाळाच.