www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘टीनएज’ मुला-मुलींना भिन्न लिंगाप्रती आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. इतरवेळी सगळं काही आपल्या आई-वडिलांशी शेअर करणारी मुलं-मुली याबद्दल मात्र आपल्या मनातील गोष्टी शेअर करणं टाळतात. कशाची बरं भीती वाटतं असेल या मुलांना... विरोध होण्याची? आपल्याला समजावून घेतलं जाणार नाही याची? की आणखी कसली?
काही वेळा पारंपरिक विचारसरणी असलेल्या आई-वडिलांना मुलांची ही गोष्ट लवकर पचनी पडत नाही. ते त्यांच्यावर स्वत:चे विचार लादू पाहतात. त्यांच्यावर विविध बंधनं लादण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते, आई-वडिलांचं हेच वागणं चुकीचं आहे. त्यांनी गंभीरतेनं आणि समजूतदारपणे हा प्रश्न हाताळायला हवा.
विसंवादामुळे आपल्या मुलांचा निर्णय चुकीचा असला तरी आई-वडील मात्र ते त्यांना समजावून सांगण्यात अपयशी ठरतात. अशा वेळी लोक काय विचार करतीय यापेक्षा आपल्या मुला-मुलींना कशाची गरज आहे, ते काय विचार करतात ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, हे आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं. आपण हाच प्रश्न दोन्ही बाजुंनी विचार करून सोडवण्याचा प्रयत्न करुयात...
मुलांना स्वतंत्रतेची आवश्यकता
स्वतंत्रता म्हणजे काय तर स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची क्षमता आणि निर्णय चुकले तर त्याची चुकवावी लागणारी किंमत भरण्याची तयारी... (केवळ पैशात नाही बरं का). तज्ज्ञांच्या मते, टीनएजमध्ये मुलांना स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असतं.
अभ्यासाकडे किंवा कामाकडे लक्ष द्यायला शिकवणं
एखाद्या पेचात अडकल्यानंतर किंवा मनात प्रेम भावना निर्माण झाल्यानंतर मुलांचं अभ्यासात किंवा कामात लक्ष लागणं कठिणच... अशा वेळी मुलांना पर्सनल आणि एज्युकेशनल/प्रोफेशनल गोष्टी कशा वेगळ्या ठेवाव्यात यासंबंधी मार्गदर्शन करावं. पण, अशावेळी आपलं मुलांसोबतचं वर्तन कसं असायला हवं हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
संवादाची गरज
टीनएजमध्ये आई-वडिलांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवण्याची गरज असते. आपली मुलं आपल्याशी नाही तर त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्त वेळ घालवतात ही गोष्ट कुठेतरी बोचत राहते. मग, या वयात असं होणारच असं म्हणून आपण पुढे चालत राहतो. पण, तुम्ही मुलांशी त्यांच्या विषयांवर बोला उदा. त्यांचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्या गप्पा... आणि बघा मुलं तुमच्याशीही कसा मोकळेपणानं संवाद साधतात ते... पण, हो त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा लगेचच जाब विचारणं मात्र टाळा... अशानं तुमचा मुलांशी विसंवादापेक्षा संवाद नक्कीच वाढेल.
सेक्स एज्युकेशन
प्रसारमाध्यमांमधून मुलांवर अश्लील गोष्टींचा सतत मारा होत असतो. त्यांना यापासून दूर ठेवणं फारसं शक्य होणार नाही पण अशावेळी योग्य काय? अयोग्य काय? याचा निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये निर्माण करा. यासाठी त्यांना योग्य वयात सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं असतं. ‘सेक्स’ हा शब्द मुलांसाठी उच्चारणंही कठिण होईल, अशी वातावरणनिर्मिती टाळा. त्यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधा. ही एक प्राकृतिक गोष्ट आहे, हे मुलांना समजावून सांगा आणि ही गोष्ट तेव्हढीच सहज आहे, हेही. त्यामुळे एखाद्या नात्यातील सीमारेषा वेगळ्या पद्धतीनं मुलांवर समजण्याची वेळ येणार नाही.
मुलांना त्यांचा असा ‘स्पेस’ द्या
आपल्या मुला-मुलींनी आपण एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतलो आहोत असं तुमच्याजवळ सांगितलं तर ताबडतोब त्यावर रिअॅक्शन देणं टाळा... स्वत:ला आणि मुलांना थोडा वेळ द्या. एखाद्या नात्यात राहूनही किंवा या नात्यानं भविष्यात हेलकावे खाल्ले तरी आपल्या सामान्य जीवनावर, आपल्या मित्र-मैत्रिणींच्या नात्यावर त्याचा परिणाम होणार नाही, मुलं निराशेच्या आहारी जाणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांना स्वत:ला जीवनाचा अर्थ समजावून घेण्यासाठी वेळ द्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.