फॉरवर्ड मॅसेज, जाहिरातीवर विश्वास ठेवतांना सावधान, फसवणूक होऊ शकते

कुणी अडचणीत असलं तर मदतीचे अनेक हात पुढे येतात... पण मदतीच्या नावाखाली तुमची फसवणूक झाल्याचं समजलं तर... असं झालंय... औरंगाबादमध्ये...

Updated: Jul 7, 2015, 08:50 PM IST
फॉरवर्ड मॅसेज, जाहिरातीवर विश्वास ठेवतांना सावधान, फसवणूक होऊ शकते title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: कुणी अडचणीत असलं तर मदतीचे अनेक हात पुढे येतात... पण मदतीच्या नावाखाली तुमची फसवणूक झाल्याचं समजलं तर... असं झालंय... औरंगाबादमध्ये...

तुम्ही अनाथ आहात... तुम्हाला ब्रेनट्यूमर झालाय... तुमच्यासाठी कुणीतरी लोकांकडून 3 लाख रुपये जमा केलेत... आणि हे सगळं तुम्हाला पेपरमधल्या बातमीवरून समजलंय... असं घडलं तर? पण औरंगाबादच्या श्याम नांदरेला मात्र अगदी असाच अनुभव आलाय.

घडलं असं की श्यामला उच्च रक्तदाब होता आणि त्यामुळे त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला मुंबईत उपचारासाठी आणलं. इथं त्याला एक भामटा भेटला. त्याच्या घरी श्याम राहिला. उपचार घेतले आणि परतही गेला. मात्र काही दिवसांनी एका स्थानिक वृत्तपत्रात श्यामला काही तरुणांनी आपल्या नावावर 3 लाख रुपये जमवल्याचं समजलं आणि त्याला धक्काच बसला.

हे समजल्यावर श्यामनं पोलिसांत धाव घेतली आणि संबंधित वृत्तपत्रालाही खरी माहिती पुरवली. पोलिसांनी आता या प्रकऱणी गुन्हा दाखल केलाय.

हल्ली फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर अशा मदतीचे मेसेज सर्रास फॉरवर्ड होत असतात. यातले अनेक जण खरंच गरजू असतात, पण अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडत असतील, तर अशा गरजूंना मदत करतानाही लोक हात आखडता घेऊ लागतील. त्यामुळेच या भामट्यांना वेळीच चाप लावायला हवा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.