धरणगाव : येथील मोठा माळीवाडा परिसरात असणार्या पाटचारीच्या पाण्यात आज सकाळी गोणपाटात एक मृतदेह तरंगत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा मृतदेह एरंडोल येथील कपाशी व्यापार्याचा असल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, मोठा माळीवाडा परिसरातील पाटचारीच्या पाण्यात महिला धुणी धुत असतांना त्यांना एक गोणपाट तरंगतांना दिसले. व्यवस्थीत बघितले असता गोणपाटाच्या वरील भागातून माणसाच्या डोक्याचे केस दिसतले महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरीक जमले.
नगरसेवक मधुकर रोकडे यांनी तत्काळ पोलीस निरिक्षक सी.डी.बनगर यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी या दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पो हे कॉ प्रभाकर बडगुजर, राकेश वराडे यांनी नागरीकांच्या मदतीने मृतदेह पाटचार्या बाहेर काढला.
गोणपाटाला सुतळीने अगदी पक्क्या पध्दतीने शिवण्यात आले होते. नगरसेवक मधुकर रोकडे गोणपाट उघडल्यानंतर त्यात एक मृतदेह आढळला. त्याच्या मानेवर, डोक्यावर धारदार शस्त्रांचे वार होते. घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी मयत हे एरंडोल येथील कापसाचे व्यापारी असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार एरंडोल पोलीस स्थानकात तपास केला असता ३१ जानेवारी रोजी त्र्यंबक पाटील यांनी बाळू रामू पाटील (वय ४२, रा.जहांगीरपुरा, एरंडोल) यांची हरविल्याची नोंद केली होती.
त्यानुसार धरणगाव पोलीसांनी संबंधितांना फोन करून धरणगाव ग्रामीण रूग्णालयात बोलावून घेतले. मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखल्यानंतर एकच हंबरडा फोडला. मयत बाळू पाटील हे कापसाचे मोठे व्यापारी होते. साधारण चार दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या खिशात तब्बल ५० हजार रूपये व आपल्या दुचाकीची चावी आढळून आली.
दरम्यान, एरंडोल येथील नागरीकांच्या म्हणण्यानुसार मयत बाळू पाटील हे शुक्रवारी रात्री ८.३० ते ९ पर्यंत एरंडोलमध्येच होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. मयत बाळू पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
एरंडोल येथील विजय महाजन यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी धरणगाव ग्रामीण रूग्णालयात भेट दिली. मयत बाळू पाटील हे शांत व प्रेमळ स्वभावाचे व्यक्ती म्हणून परिचीत होते.
दुचाकी देखील सापडली पाटचारीत
मयत बाळू पाटील यांची मोटारसायकल (क्र.एम.एच.१९-१०५२) ही काल सायंकाळी हिंगोणे-जवखेडा जवळील पाटचारीच्या पाण्यात आढळून आली आहे. त्यामुळे मारेकर्यांनी त्यांना याच ठिकाणाहून मारून पाण्यात फेकल्याचा संशय आहे. मयताच्या खिशात साधारण ५० हजार रूपये एवढी मोठी रक्कम आढळून आल्यामुळे हा खून पैशांसाठी नसल्याचेदेखील स्पष्ट आहे. एरंडोल पोलीस स्थानकाचे पोहेकॉ बापू पाटील हे मयताच्या हरविल्याचा तपास करीत होते.
दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी त्यांना कुणावरही संशय नसल्याचेदेखील सांगितले होते. परंतु आज मृतदेह आढळल्यामुळे या घटनेला वेगळेच वळन लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.