जळगाव : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने पळ काढला, लग्नाची तयारी झाली होती, तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी करत, दुसरी बोलणी सुरू झाली आणि ऐन वेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं.
लग्नाच्या दिवशीच सकाळी सहा वाजल्यापासून नवरा मुलगा राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. दुसरीकडे लग्नाची तयारी करून वरातीच्या प्रतीक्षेत असलेल्या वधुपक्षाला ही बाब समजातच त्यांना धक्का बसला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोचण्याआधीच समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी मध्यस्थी केली.
जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील एका युवकाचे शहरातीलच खंडेराव नगरातील मुलीशी लग्न ठरले होते. एक वर्षांपूर्वी त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. सर्व बोलणी होवून लग्नाचे कपडे देखील घेण्यात आले होते. रविवारी, सकाळी ११ वाजता खंडेराव नगरात या दोघांचा विवाह होणार होता. त्यासाठी दोन्ही परिवारांकडून गेल्या आठ दिवसांपासून तयारीची धामधूम सुरू होती.
वर-वधू पक्षाकडून तक्रारी
मुलींच्या वडिलांनी रामानंद पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी 'तुमच्या मुलीचे 'त्या' मुलाशी लग्न करू नका' अशा धमकीचा फोन आल्याची तक्रार नोंदविली आहे. तर लग्नाच्या दिवशीच बेपत्ता झालेल्या मुलाने तीन ते चार दिवासांपूर्वी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली असून, एका अज्ञात मोबाइलवरून 'त्या' मुलीशी लग्न करू नको, नाहीतर पाहून घेईन, अशी धमकी दिल्याची तक्रार नोंदविली आहे.