रत्नागिरी : नेमिची येतो पावसाळा आणि पावसाळा सुरु झाला की कोकण रेल्वेच्या मार्गात अडथळ्यांचे डोंगर उभे राहतात. नेहमी प्रमाणे यावर्षीही रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून कोकण रेल्वेकडून करण्यात आली. त्याचवेळी निर्सगाची साथही मिळावी, अशी अपेक्षाही कोकण रेल्वेनं व्यक्त केलीय.
पावसाळ्यात उद्धभवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झालीय. कोकणात देशाच्या सरासरी पावसाच्या तुलनेत तीन पट पाऊस पडल्याची नोंद कोकण रेल्वेने समोर आणलीय. त्यामुळे कोकण रेल्वेनं विशेष काळजी घेतलीय, अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिलेय.
पोमेंडीमध्ये रेल्वेमार्गावर येणारा अख्खा डोंगर कापून काढत, कोकण रेल्वेने तब्बल सा़डेतीन लाख क्युबिक मीटर माती अन्यत्र हलवली. तर निवसरमध्ये खचणा-या मार्गाला पर्यायी मार्ग कोकण रेल्वेने तयार केलाय. याच बरोबर बोगद्यातल्या ड्रेनेजची साफसफाई करण्यात आलीय.
तसंच पाणी साचू नये यासाठी विशेष खबरदारीही घेतली गेलीय. मान्सून काळात संपूर्ण कोकण रेल्वेमार्गावर चोवीस तास मानवी गस्त घातली जाते. याकरिता या संपूर्ण मार्गावर ५०० पेक्षा जास्त माणसं तैनात केली गेलीत.
यावर्षी कोकण रेल्वेनं अठ्ठावीस ठिकाणी विशेष खबरदारी घेतलीय. गेल्या अनेक वर्षांचा कोकणच्या निसर्गाचा अनुभव घेतलेल्या कोकण रेल्वेनं, मार्ग सुरक्षित असल्याचा दावा केलाय. सोबतच इथल्या निसर्गाचीही साथ मिळाली पाहीजे, अशी अपेक्षाही व्यक्त केलीय.