मुंबई : ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.
ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. यासाठी आज मतदान होतंय. शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि ४ वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्यात ही लढत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाटक यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावलंय. मनसेचे काहीजणही महायुतीच्या गळाला लागले असून आघाडीच्या अलीबाग टूरमध्येही शिवसेनेनं जाळं फेकल्याची चर्चा आहे.
काँग्रेसकडून राष्ट्रवादीला दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे यावेळी डावखरेंना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर आपण चमत्कार घडवू, असा डावखरेंना विश्वास आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका तसंच मुरबाड आणि शहापूर नगर पंचायतीचे ८०८ सदस्य यात मतदान करतील.
तसंच पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार महापालिका, पालघर जिल्हा परिषद, डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपंचायतीचे २५२ सदस्यही मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ६ जूनला होईल. मात्र, शिवसेना-भाजपचे मतदार जास्त आहेत. जर मनसे आणि अपक्षांनी साथ दिली तर शिवसेनेचा विजय निश्चित आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीला मोठा धोका आहे. काँग्रेसची एक गठ्ठा मत मिळाली तर विजय सोपा आहे. असे असले तरी दगाफटका होण्याची शक्यता आहे.