www.24taas.com झी मीडिया, मुंबई
चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातून आतापर्यंत 2 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर ग्रामीण भागातल्या ५६० जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. इरई धरण ३० टक्के रिकामं करण्यात आलं आहे. पूरस्थितीतून नागरिकांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
यवतमाळला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून या पावसात यवतमाळ जिल्ह्यातले पाच जण वाहून गेले आहेत. पुसदमध्ये 3 वर्षांची मुलगी आणि आई वाहून गेले. तर महागावमध्ये ४२ वर्षांचा व्यक्ती वाहून गेला आहे. राळेगाव तालुक्यातही एक जण वाहून गेला आहे.
जिल्ह्यात पावसानं आत्ताच वार्षिक सरासरी ओलांडल्याने वणी, उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी, झरी जामणी या तालुक्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा, खुनी, वाघाडी, पूस, अरुणावती, अडान, निर्गुडा या नद्यांना महापूर आला असून अनेक गावांना पूराने वेढा घातला आहे. सततच्या पावसामुळे सर्व लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून इसापूर, बेंबळा, अडान, अरुणावती, पूस या पाच प्रकल्पांचे ४१ दरवाजे उघडले आहेत. अतिवृष्टीने सर्वाधिक हानी झाली ती शेती आणि शेतकऱ्यांची. जवळपास एक लाख हेक्टर वरील पिकाचं नुकसान झालं आहे.
जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं सकाळपासून उघडीप घेतली आहे. हतनूर धरणातून १ लाख ७२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. धरणाचे ४१ पैकी ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी तसेच पुर्णा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाचा फटका जळगाव जिल्ह्याला बसला आहे. दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातल्या बागायती केळीच पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच कोट्यावधी रुपयांच नुकसान झालं आहे. तसंच खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन ही पीकं पाण्याखाली गेली.
हतनूर आणि अनेर धरणातून पाणी तापी नदीत सोडण्यात आल्यानं धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची रिप रिप सुरु असल्याने पीकं खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.