ठाणे : अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी भाजपचे मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला. त्यांनी मी नथुराम बोलतोय, बंद झाल्यामुळे मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात, असे विधान केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीरपणे खिल्ली उडविली, तर महात्मा गांधींवर नाव न घेता टीका केली. मी संघामध्ये बारा वर्ष शाखेत जात होतो, मात्र ते दंड शिकवितात; पण मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात. मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात, पण नुसती राखी वा नमस्ते सदा... म्हणून काहीही होणार नाही. म्हणून आपण संघातून बाहेर पडलो, असे रोखठोक मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याचा समाचार पोंक्षे यांनी घेतला. कोणाला शिवसेना समजलेली नाही. कोणाच्या तरी विचारात चालणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे बचावले.
'मी नथुराम बोलतोय...'या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग थांबविल्याबद्दल खंत यावेळी व्यक्त केली. आपण नाटकातून नथुरामांच्या राष्ट्रभक्तीचाच प्रसार केला जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सध्या मराठी रंगभूमीमध्ये कोणीही येतो, काहीही लिहितो आणि त्याला नाटककार म्हटले जाते. काही जणांकडून काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी नाटके काढली जातात. त्यामुळे याचा मोठा फटका बसत आहे, असे पोंक्षे म्हणालेत.
नाट्यसंमेलनातील नटवर्य मामा पेंडसे रंगमंचावर पोंक्षे यांच्याशी संवादक समीर लिमये यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाबाबत परखड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी झटपट प्रसिद्धीसाठी कलाकार मूळ अभिनय विसरत असल्याचे मत व्यक्त केले. अनेक निर्मात्यांना मराठीच कळत नाही. त्यामुळे मालिकांचा दर्जा घसरत आहे, असे ते म्हणालेत.
भगव्याचा अभिमान असल्याचे जाहीर केले. भगव्या रंगाला हिरवी-पिवळी किनार नको, असे म्हणत त्यांनी भाजपवरही जोरदार शरसंधान केले. संघाबाहेर पडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील सभेला गेलो. त्या सभेनंतर भगवा पाहिला की माझी चाल बदलते, असे त्यांनी नमूद केले.