सातारा : आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्तेबाबत सतत चर्चा होत असली तरी आम्ही सत्तेचा विषय सोडून दिलाय. आम्ही सत्तेसाठी भिकारी नाही की कटोरा घेवून फिरणारी माणसे नाहीत. आम्ही नावाप्रमाणे स्वाभिमानी आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.
आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सध्या लोकांची कामे घेवून मुख्यमंत्र्यांना भेटतोय. महामंडळे कधी वाटणार किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणार नाही. आम्ही आधीच स्पष्ट केलेय. मुख्यमंत्र्यांना चार महिन्यापूर्वीच सांगितले आहे की पुन्हा यावर चर्चा करणार नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्याबाबत शेट्टी म्हणालेत, ती तांत्रिक बाब आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांनी मान्यता रद्द करण्याचा आदेश मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच एका प्रश्नाबाबत सदाभाऊ यांच्याबाबत विचारले असता, त्यांनाच विचारा असे उत्तर शेट्टी यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.