मनाला चटका लावून जाणारा 'अनन्य सोहळा'

झी २४ तास या अग्रगण्य वृत्तवाहिनीतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना “अनन्य सन्मान” देऊन गौरवण्यात येते. यंदाही राजकारण, कला, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक ०२ मार्च २०१२ रोजी कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये ‘अनन्य सन्मान – २०११’ हा सोहळा पार पडला.

Updated: Mar 7, 2012, 04:50 PM IST

 

www.24taas.com,मुंबई 

झी २४ तास या अग्रगण्य वृत्तवाहिनीतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना “अनन्य सन्मान” देऊन गौरवण्यात येते. यंदाही राजकारण, कला, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक ०२ मार्च २०१२ रोजी कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये ‘अनन्य सन्मान – २०११’ हा सोहळा पार पडला.

 

विविध क्षेत्रांत कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता समाजासाठी झटणा-या कर्मवीरांचा गौरव ‘झी २४ तास”तर्फे करण्यात आला. ‘अनन्य सन्मान- २०११’ सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनिल तटकरे, जे.जे रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापुरकर, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे आणि झी न्यूज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर पुनीत गोएंका व लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते.

 

कधीही प्रकाश झोतात न येता सातत्याने विविध क्षेत्रांत अतुल्य योगदान देणा-या पडद्यामागच्या नायकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मान करणं हा अनन्य सन्मानचा मुख्य उद्देश. सात वेगवेगळ्या विभागांत झी २४ तास अनन्य सन्मान प्रदान करण्यात आला.

 

श्रीमती अमिरबी शेख यांना शिक्षण क्षेत्रातील अनन्य सन्मान २०११ देऊन गौरवण्यात आले.( अमिरबी शेख यांनी सांगलीमध्ये वेश्यांसाठी शाळा सुरू केली आहे )

 

श्री सुरेंद्र साळवी यांना मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान २०११ प्रदान करण्यात आला ( विग मेकर सुरेंद्र साळवी हे गेल्या २५ वर्षांपासून पडद्यामागे राहून चित्रपटसृष्टीची सेवा करत आहेत)

 

श्री प्रमोद चांदुरकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले. ( धनुर्विद्येच्या क्षेत्रात एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणा-या लिंबारामचे ते प्रशिक्षक. लिंबारामबरोबरच या  क्षेत्रात त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले आहे.)

 

श्री नामदेव कुरसुंगे यांना शौर्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( गोंदियातील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात डोळा गमावला असतानाही पुन्हा धैर्यानं वन रक्षणाच्या कामात रुजू झाले )

 

श्री मानव कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. ( मानव कांबळे यांनी पुण्यात गरीब आणि अपंग मुलांसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात केली. मानव कांबळे हे स्वत:  अपंग आहेत )

 

श्री संदीप गिरासे यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात आले. ( संदीप गिरासे यांनी विदर्भातील शेतक-यांना दुग्ध उत्पादनाचा पर्याय खुला केला )

 

पुण्यातील ए.आर.टी.आय संस्थेला पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनन्य सन्मान २०११ प्रदान करण्यात आला. ( ए.आर.टी.आय ने रायगडमधील एका आदिवासी गावाला गॅसिफायर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वीज मिळवून दिली.)

 

ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव णि सीमा देव यांना अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देव दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

 

‘झी २४ तास अनन्य सन्मान – २०११’ या सोहळ्याचे प्रक्षेपण शनिवार १० मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता आणि रविवार ११ मार्च २०११ रोजी रात्री ९ वाजता झी २४ तास या वाहिनीवर करण्यात येणार आहे.

अनन्य सन्मानांची काही खास क्षणचित्रे