www.24taas.com, मुंबई
परीक्षेच्या कालावधील स्कूलबस चालकांनी संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत होता. संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संप मागे घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा गंभीर इशारा स्कूलबस चालकांना दिला होता. या इशाऱ्यानंतर स्कूलबस चालकांनी आपला पुकारलेला संप मागे घेतला. तशी घोषणा संघटनेकडून करण्यात आली.
स्कूल बस चालक संघटनांच्या बेमुदत संपाच्या विरोधात पालक संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर पुढील सुनावणी सोमवारी होणार होती. हायकोर्टानं बस चालक संघटनांना सोमवारच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. हा संप अवैध असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या विरोधात असल्याचं पालक संघटनांचं म्हणणनं होतं. या संपाला चाप लावण्यासाठी पालक संघटनांनी जनहित याचिका दाखल करत मुंबई हायकोर्टात धाव घेतली. आता संप मागे घेतल्याने याचिकेवर सुनावणी होईल की नाही याकडे लक्ष लागले आहे.
पुण्यात स्कूल बस चालकांच्या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. पुण्यात बहुतेक विद्यार्थी वाहतूक ही रिक्षा आणि शाळांच्या खासगी बसेसमधून होते. शहरात केवळ १५०० खासगी बसेस आहेत. बस ड्रायव्हर संपावर असले तरी बहुतेक पालकांनी आपल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत सोडलंय. तर नाशिकमध्येही संपाला अल्प प्रतिसाद मिळालाय. पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही पालकांनी आपल्या मुलांना स्वतःच्या वाहनातून शाळेत सोडलं. त्यामुळे वेठीस धरणाऱ्या स्कूलबस चालकांना चाप बसला.
मंबईसह राज्यभरातल्या स्कूल बस चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांचे हाल झालेत. सकाळी पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची कसरत करावी लागत होती. सध्या परीक्षेचा काळ असल्यामुळं तर विद्यार्थ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडत होती. स्कूल बसचालकांच्या मागण्या मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं, संघटनेनं अखेर संपाचं हत्यार उपसलंय. स्कूल बसबाबत परिवहन विभागानं तयार केलेल्या नियमावलीत बदल करण्याची मागणी, गेली ६महिने संघटना करतेय. यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी बस मालक संघटनेच्या सदस्यांना भेट नाकारली होती. यावरुन सरकार बस मालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्कूल बस चालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला होता.
त्यानंतर राज्य सरकार आणि स्कूल बस ओनर्स असोसिएशन यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत मागण्या मान्य करण्याबाबत ठाम आश्वासन न मिळाल्यानं संपाचं हत्यार उपसण्यात आलंय. संपामुळे ऐन परिक्षेच्या काळात मुंबईसह राज्यभरातल्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची अडचण झालीय. मुंबईत सुमारे ३हजार बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करतात. तर रोज मुंबईतले चार लाख विद्यार्थी बसने प्रवास करतात. त्यामुळे संपाची झळ पालक आणि विद्यार्थ्यांना बसणार होती.