Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ येथे खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जयसवालने आपल्या फलंदाजीने संघ व्यवस्थापनाबरोबर कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं. या तरुण खेळाडूने आपल्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर भारताची सामन्यातील स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. जयसवालने असा विक्रम आपल्या नावे केला आहे की जो यापूर्वी कोणाच्याच नावावर नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान जयसवालने ऑस्ट्रेलियन संघातील क्रिकेटपटू मार्नस लाबुशेनला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. या दोघांमधील या मजेदार बाचबाचीचा क्षण कॅमेरात कैद झाला.
जयसवालने पॉइण्टच्या दिशेने चेंडू टोलवून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जितक्यात लाबुशेनने चेंडू उचलला आणि स्टम्पवर मारण्यासाठी धावला. त्यानंतर क्रिजजवळ पोहचल्यावर जयसवालने लाइन न ओलांडता क्रिजबाहेर उभं राहून लाबुशेनला 'मार ना, कर रन आऊट' अशाप्रकारचं आव्हान केलं. लाबुशेनकडे पाहत जयसवाल क्रिजच्या अगदी जवळ उभा होता मात्र त्याने क्रिज क्रॉस केलेली नव्हतं. लाबुशेननेही एक एक पाऊल पुढे टाकत चेंडू मारेन अशी हूल दिली. मात्र त्याने प्रत्यक्षात चेंडू स्टम्पवर फेकला नाही.
हा सारा प्रकार पाहून कॉमेंट्री बॉक्समधून, 'जयसवाल या सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे,' असं म्हणत कॉमेंटेटर हसला. जयसवाल आणि लाबुशेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा जयसवाल नाबाद 90 धावांवर होता. के. एल. राहुलच्या सोबतीनं त्याने 172 धावांची पार्टनरशीप केली आहे. आपल्या या खेळीमध्ये जयसवालने 2 षटकारही लगावले आहेत. दुसऱ्या शतकासहीत जयसवालने एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम आफल्या नावे केला आहे. 2024 मध्ये जयसवालने एकूण 34 षटकार लगावले आहेत. हा आकडा येणाऱ्या काही सामन्यांमध्ये अजून वाढू शकतो.
पर्थ कसोटीचा दुसरा दिवस भारतीय संघाने गावजला. एकही विकेट न गमावता भारताने 172 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकची एकूण आघाडी 218 धावांची आहे. जयसवालबरोबर राहुलनेही 62 धावा केल्या असून तो नाबाद राहिला आहे. पहिल्या डावात भारताने केलेल्या 150 धावांनंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांमध्ये आटोपला.