Job News : कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं काही नियमांची आखणी केली जाते. अनेकदा हे नियम लावले जातात यापेक्षा नियम लादले जातात असं म्हणायला हरकत नाही. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं हल्ली जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात कुठे ना कुठे कोणत्या ठिकाणी, कोणत्या संस्थेमध्ये नेमकं काय सुरुय, कर्मचाऱ्यांना कशी वागणूक दिली जातेय, कोणत्या सुविधा दिल्या जातायत इतकंच काय तर, कर्मचाऱ्यांवर कोणते नियम लादले जात आहेत याविषयीची माहिती अगदी सहज उपलब्ध आहे. त्यातच आता एका कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी आखलेल्या विचित्र नियमाची नव्यानं चर्चा सुरू आहे.
दक्षिण चीनमध्ये असणाऱ्या एका कंपनीतून कर्मचाऱ्यांवर चक्क लघुशंकेसाठीच्या वेळेचं बंधन घालणारा नियम आखण्यात आला आहे. कंपनीच्या या 'टॉयलेट रुल'ची सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. कंपनीच्या दाव्यानुसार प्राचीन चीनी चिकित्सा शास्त्रानुसारच हा नियम आखण्यात आला आहे.
चीनच्या गुआंग्डोंग प्रांतातील फोशान इथं असणाऱ्या थ्री ब्रदर्स मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं 11 फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांवर लघुशंकेसाठी प्रसाधनगृहाच्या वापरासंदर्भातील हा नियम लागू केला. एक साचेबद्ध व्यवस्था लागू करणं हाच त्यामागचा मुख्य हेतू असून, सतर्कता कायम राखणं हा मुद्दा अधोरेखित केला.
स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार कंपनीनं हा नियम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं सांगितलं. 2000 वर्षांपूर्वीच्या या ग्रंथात ही बाब नमूद असून, हे संदर्भ चीनमधील चिकित्सा क्षेत्रातील सुरुवातीच्या काही संदर्भांमधील असल्याचं सांगितलं जातं.
कंपनीनं आखलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना सकाळी 8 वाजण्यापीर्वी, सकाळी 10.30 ते 10.40 दरम्यान, दुपारी 12 ते 1.30 वाजल्यापासून दुपारी 3.30 ते 3.40 पर्यंत आणि सायंकाळी 5.30 ते 6 वाजेपर्यंत शौचालयाचा वापर करण्याची परवानगी असेल. ओवरटाईम शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री 9 वाजल्यानंतर या सुविधांचा वापर करता येणार आहे.
वरील वेळा वगळता जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरम्यानच्या वेळेत लधुशंकेस जाण्याची गरज भासली तर ते असं करु शकतात. मात्र त्यांना यासाठी 2 मिनिटांचाच वेळ दिला जाईल. विशिष्ट शारीरिक व्याधींमुळं ज्या कर्मचाऱ्यांना शौचालयाचा वापर करावा लागेल त्यांनी HR कडून यासाठीची रितसर परवानगी घ्यावी पण, यादरम्यान त्यांच्या पगारात मात्र कपात केली जाईल.
कर्मचारी या नियमाचं पालन काटेकोरपणे करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्यावर करडी नजर ठेवणार आहे. इतकंच नव्हे, तर नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून 100 युआन इतका दंड आकारला जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत कंपनीकडून हा नियम प्रायोगिक तत्त्वांवर लागू करण्यात येणार असून, 1 मार्चपासून त्याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.
चीनमधून या नियमाचा कडाडून विरोध करण्यात येत असून, कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात टाकत लागू करण्यात आलेला हा नियम घातक असल्याचं सांगितलं. सार्वजनिकरित्या जेव्हा कंपनीचा हा विचित्र नियम जगासमोर आला तेव्हा विविध स्तरातून त्याचा कडाडून विरोध झाला. अशी नोकरी नको रे बाबा! अशीच प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली. ज्यानंतर हा विरोधाचा सूर पाहता 13 फेब्रुवारी रोजी अखेर कंपनीनं नियम रद्द केला जात असल्याची अधिकृत घोषणा घेत विरोधापुढं नमती भूमिका घेतली.