Research on Cancer: कॅन्सर हा आजार दुष्मनालाही होऊ नये असं म्हणतात. कारण याची लक्षणे, यासाठी लागणारा खर्च, येणारा ताण हे सर्वच वेदनादायी असते. जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. कॅन्सर प्रतिबंधक लस पुढच्या 6 महिन्यात उपलब्ध होऊ शकते अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच याची माहिती दिलीय. दरम्यान अमेरिकन संशोधनकांनी कॅन्सरसंदर्भात मोठे संशोधन केले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर तर महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तनाचा कॅन्सर होतो. हा वाढता धोका लक्षात घेता आणि केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाताहेत. जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू करणार, रोग निदान पहिल्याच टप्प्यात कळले तर उपचार करणे सोपे होते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे संशोधन समोर आलंय.
अमेरिकन संशोधकांकडून अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी उंदरावर प्रयोग करण्यात आले. यात ट्रिम-28 जनुकाची कमी पातळी असलेल्या उंदरांमध्ये कर्करोगाशी संबंधित जनुकांवर एपिजेनेटिक मार्कर 2 भिन्न पॅटर्नमध्ये आढळून आले. हे पॅटर्न सुरुवातीच्या टप्प्यात विकसित होतात. प्रत्येक असामान्य पेशी कर्करोगात बदलत नाही; असे संशोधनात आढळून आल्याची माहिती अमेरिकन संशोधकांकडून देण्यात आली.
मिशिगनमधील व्हॅन अँडेल इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी जोखीम असलेल्या लोकांमध्ये ल्युकेमियासारख्या द्रव ट्यूमर विकसित होण्याचा धोका जास्त असतो. उच्च-जोखीम असलेल्या परिस्थितीत, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कर्करोगाचा धोका असतो. कॅन्सर संदर्भात नेचर कॅन्सर जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानुसार कॅन्सरच्या दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक स्थिती ओळखल्या असून यात व्यक्तीला कॅन्सरचा धोका किती हे कळू शकणार आहे. हे एपिजेनेटिक्स व्यक्तीमध्ये पहिल्याच स्टेजमध्ये विकसित होतात. याद्वारे डीएनए न बदलता नियंत्रित केल्या जातात. यापैकी एका एक स्थितीत कर्करोगाचा धोका कमी होतो तर एका स्थितीत कर्करोगाचा धोका वाढतो, अशी माहिती संशोधनात देण्यात आली आहे.
2020 मध्ये जगभरात 1 कोटी मृत्यू हे कॅन्सरने झाले आहेत. यामुळे कॅन्सरचे गांभीर्य आपल्याला कळू शकेल. प्रत्येक 6 मृत्यूपैकी एक मृत्यू हा कॅन्सरने होतो. ब्रेस्ट, फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढल्याचेही आपण पाहिले असेल. कॅन्सर झालेल्या 3 पैकी 1 मृत्यू हे तंबाखूचे सेवन, अधिक बीएमएआय, मद्यपान, कमी फळे आणि भाज्यांचे सेवन आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
येत्या 6 महिन्यात कॅन्सर प्रतिबंधक लस बाजारात येऊ शकते. कर्करोगावर नवीन लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाल्याची माहिती आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलीय. येत्या सात-आठ महिन्यांत लसीचं काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा प्रतापराव जाधवांनी केलाय. भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.
भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या वर आहे. कॅन्सरमुळे भारतात दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो. दरवर्षी नव्याने नोंदणी होणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या 7 लाखाच्या वर असते. कॅन्सर संबंधित मृत्यूंची संख्या 5 लाख 56 हजार इतकी आहे. स्तनाच्या कॅन्सरनं त्रस्त जगभरातल्या प्रत्येक 2 महिलांमागे 1 महिला भारतातील असते. भारतात दर दिवशी 2500 जणांचा तंबाखू संबंधित कॅन्सरनं मृत्यू होतो. 5 पैकी एका पुरुषाचा, 20 पैकी एका महिलेचा मृत्यू धुम्रपानामुळे होतो. 2010 साली धुम्रपानामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 9 लाख 30 हजार इतकी होती.