मायानगरी मुंबईत ती कशी आली, तिची कर्मकहाणी..

मायानगरी मुंबईत दररोज अनेकजण येऊन धडकतात. कुणी कामानिमित्त, कुणी गरजेपोटी. कुणी हौसेनं तर कुणी बळजबरीनं. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. मुंबईच्या गर्दीत ही मुलं कुठं हरवतील, याचा नेम नसतो. आफ्रिकेतल्या इथिओपिया देशातून आलेल्या अशाच एका मुलीची ही कर्मकहाणी. 

Updated: Sep 13, 2014, 08:20 PM IST
मायानगरी मुंबईत ती कशी आली, तिची कर्मकहाणी.. title=

दीपाली जगताप-पाटील / मुंबई : मायानगरी मुंबईत दररोज अनेकजण येऊन धडकतात. कुणी कामानिमित्त, कुणी गरजेपोटी. कुणी हौसेनं तर कुणी बळजबरीनं. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. मुंबईच्या गर्दीत ही मुलं कुठं हरवतील, याचा नेम नसतो. आफ्रिकेतल्या इथिओपिया देशातून आलेल्या अशाच एका मुलीची ही कर्मकहाणी. 

मुंबईत हरवलेल्या मुलांचं आश्रयस्थान म्हणजे डोंगरीचं बालसुधारगृह. गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यात अशाच एका 17 वर्षांच्या मुलीला मुंबई सेंट्रल पोलिसांनी याठिकाणी आणलं. तेव्हा तिची काहीच ओळख नव्हती. कारण ती भारतीय नव्हती. तिची भाषाही धड कोणाला कळत नव्हती. 

ती कोठून आली, कशी आली याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. शिवाय एअरपोर्टला तिच्या नावाची साधी एन्ट्रीही नव्हती. मूळची इथिओपिया या देशाची असलेली कायरा. सौरबीया ही तिची मातृभाषा. इथिओपिया देशाच्या एम्बॅसीने तिची भाषा समजून घेऊन तिच्याकडून जी माहिती घेतली, ती अक्षरशः धक्कादायक होती. 

बाल कल्याण समितीच्या अहवालानुसार, तिला सौदीवरुन भारतात आणले गेले. इथं एका मोठ्या घरात ती राहत होती. एका वेड लागलेल्या आजीची देखभाल करण्यासाठी तिला इथं आणलं होतं. या घरात तिला पोटभर जेवणही द्यायचे नाहीत, ती चोरुन खायची. ज्या घरात तिनं तीन महिने काम केलं, तिथून तिला एक पैसाही मिळाला नाही. ती म्हातारी बाई तिला मारहाण करायची. तिच्या अंगावर भांडी फेकायची, तिचे कपडे फाडायची. अशा परिस्थितीत कायराला तिथं राहणं कठिण झालं. 

कायरा तिथून पळाली. आणि वसई-विरारच्या ट्रेनमध्ये चढली. ट्रेनमध्ये रडत असताना एका अनोळखी महिलेनं तिला पाहिलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिला भारतात कुणी आणलं, कसं आणलं, याचा तपास अजून लागलेला नाही. पण बाल कल्याण विभागानं इथिओपिया इथं राहत असलेल्या तिच्या कुटुंबियांना शोधून काढलं आणि आता 19 तारखेला कायरा आपल्या मायदेशी परत चाललीय. 

कायरालाही कधी एकदा आपल्या घरी परततेय, असं झालंय. एका स्वयंसेवी संस्थेनं तिच्या विमानाच्या तिकीटाचे पैसे दिलेत. त्यामुळं कायराचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 
 
मुंबईसह भारतात अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात चाईल्ड ट्रॅफिकींग होतं. हजारो मुलं कामाला जुंपण्यासाठी आणली जातात. त्यांना राबवून घेतलं जातं. कायराचं नशीब थोडंफार चांगलं होतं म्हणून ती आधी पोलिसांकडे, मग बालसुधारगृहात आणि नंतर तिच्या आईवडिलांपर्यंत सुखरूप पोहोचली. पण कायरासारखी शेकडो मुलं मुंबईच्या गर्दीत हरवून जातात. त्यांचं काय बरं होत असेल? 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.