मुंबई : एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
गेल्या दोन वर्षात अनेक प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे केवळ मंजुरीवर न थांबता आदेशांची अंमलबजावणीही सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ठाण्याच्या कोपरी पुलाचं रुंदीकरणही करण्यात येणार आहे.
मेट्रोच्या तिकिटाचा कमीत कमी दर हा १० रूपये ठेवण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. वडाळा ते कासारवडवली (ठाणे) या मेट्रो ४ प्रकल्पाला नुकताच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. एमएमआरडीएतर्फे संपूर्ण मुंबई आणि उपनगरमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
दहिसर-डी. एन. नगर (मेट्रो-२ए), दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मेट्रो-७), डी. एन. नगर-मानखुर्द (मेट्रो-२बी), कासारवडवली-वडाळा (मेट्रो-४) अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. मेट्रोच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यापैकी एमएमआरडीए ६ हजार ९४० कोटी रुपये देणार असून राज्य सरकार ३ हजार ६९३ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. उर्वरित ३ हजार ९१६ रुपये हे कर्ज स्वरूपात उभारले जातील. मेट्रो चारच्या कारशेडसाठी ओवळा येथे ३० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ३३ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर एकूण ३२ स्थानके आहेत.