www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वादग्रस्त कार्टूनप्रकरणी अटकेत असलेल्या असीम त्रिवेदींची पाठराखण करत सरकारवर जोरदार आगपाखड केलीय. ‘राजद्रोह कशास म्हणावं हे सरकारला कळत नसतांना नसती उठाठेव कशासाठी?’ असा सवालही बाळासाहेबांनी केलाय.
दरम्यान, व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अखेर जामीन मंजूर करण्या आलाय. त्रिवेदींनीही जामीन घ्यायला आता तयारी दाखवलीय. हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत घेऊन ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेचे सदस्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटले. आज असीम त्रिवेदींची सुटका होणार आहे.
मंगळवारी, आयएसीसह अनेक संघटना त्रिवेदींच्या बाजूनं मैदानात उतरल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येऊन आर्थर रोड जेलमध्ये असीम त्रिवेंदी भेट घेतली. यावेळी जेलबाहेर आयएसीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी बोलताना केजरीवालांनी सरकारला धारेवर धरत, सुटकेसाठी शुक्रवारची मुदत दिली. त्रिवेंदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. केजरीवालांच्या या भेटीनंतर आणि एकूणच या वादानंतर, सरकारही थोडं बॅकफूटवर आलं. असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला मागे घेणार असल्याचा विचार सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं. त्यासाठी विधी व न्याय विभागाकडून अहवाल मागितला असून त्याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं सांगण्यात आलंय. आता असिम त्रिवेदींना जामीन तर मंजूर झाला, मात्र त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला सरकार मागे घेणार का, याचं उत्तर 14 तारखेला हायकोर्टात सुनावणीवेळीच होणार आहे.