मुंबई : कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम याच्या गॅंगमधील एकाची भाजपचा कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. दरम्यान, भाजपने याबाबत मौन बाळगळ्याने राष्ट्रवादीच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा आहे.
दाऊदचा हस्तक रियाज भाटी भाजपच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. भाजपमध्ये 'डी' गॅंगचे लोक असल्याचा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, भाजपमध्ये गुंडाचा भरणा होत असल्याचा आरोप आधीच करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीने दाऊदच्या हस्तकाचे नाव घेऊन मोठा गौप्यस्फोट केलाय.
दाऊदचा हस्तक रियाज भाटी याची भाजपच्या कार्यकरिणीवर नियुक्ती केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रियाज भाटीची भाजपमधून हकालपट्टी का करण्यात आली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळं भाजप नेते यावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं पुढं आले आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, ज्येष्ठ नेते माधव भांडारींसह भाजप नेत्यांनी याबाबत हात झटकले आहेत. त्यांनी भाटीबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भाजप पक्ष अडचणीत आला आहे. आधी नाशिक आणि पुण्यातील पक्ष प्रवेशाच्यावळीही गुंडांना स्थान दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पक्षांने स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन यापुढे कोणाला पक्षात घ्यायचे हे अधिकार दिलेत. त्यामुळे या नव्या आरोपामुळे भाजपची अडचण वाढली आहे.