मुंबई : भारताची गुप्तहेर संघटना सध्या कराचीवर लक्ष ठेऊन आहे. कारण डॉन दाऊद इब्राहिमची बर्थ-डे पार्टी आहे. यासाठी तो खास बुलेटप्रुफ गाडीने येणार आहे. त्याला ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर
भारताचा सर्वात मोठा वैरी दाऊदचा शनिवारी साठावा वाढदिवस आहे. पण नेहमीप्रमाणेच पकडेल जाण्याच्या किंवा मारले जाण्याच्या भीतीने तो त्याचा वाढदिवस साध्या पद्धतीनंच साजरा करणारय. सध्याच्या भारत सरकारविषयीच्या दडपणाने दाऊद त्याचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करतोय. या सरकारच्या भीतीपोटी या पार्टीसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे.
बारकोड असेल तर प्रवेश
दाऊद पार्टी हॉलमध्ये एका बुलेटप्रुफ गाडीनं येणारय. पार्टी एका इनडोअर हॉलमध्ये असेल. या पार्टीला येणाऱ्या पाहुण्याना निमंत्रण पत्रिका आणणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्यावर या पत्रिकेवरचे बारकोड अपडेट केल्यानंतरच हॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कुठलंही गिफ्ट न आणण्याचीही विनंतीही पाहुण्यांना करण्यात आलीय.
कोण कोण येणार?
पार्टीमधील दाऊदचा एकही फोटो लिक होऊ नये यासाठी पाहुण्यांना हॉलमध्ये मोबाईल आणण्यास मनाई आहे. या पार्टीसाठी सुमारे १००पाहुणे मंडळी येणारयत. कराचीमधल्या एअरपोर्टजवळच्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये त्याचा साठावा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. यावेळी त्याची पत्नी, मुली, जावई आणि काही जवळची मित्रमंडळी सहभागी होणार आहेत.
छोटा शकीलचा तोफा
दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकीलनं दाऊदसाठी एक गिफ्टही खरेदी केलंय. छोटा शकीलनं ३ कोटींचे एक रिव्हॉल्वर त्याच्या बॉससाठी खरेदी केले आहे. या रिव्हॉल्वरचं हँडल १८ कॅरेट सोन्यावर हिऱ्यांनी सजवलेलं आहे. तर ट्रिगर व्हाईट गोल्डचं आहे. दरम्यान बॉलीवूडमधील कुणालाही या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही.